राज्यातील पक्षीमित्रांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनावर करोनाचे दाट सावट पसरले आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित होणारे हे संमेलन यावर्षी करोनामुळेच पुढे ढकलून एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आले. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा  वाढल्याने सोलापूर येथे आयोजित या संमेलनावर टांगती तलवार कायम आहे.

महाराष्ट्र पक्षीमित्रच्यावतीने राज्यातील पक्षीमित्र  दरवर्षी जानेवारी महिन्यात दोन दिवसीय पक्षीमित्र संमेलन आयोजित करतात. वनखात्याच्या सहकार्याशिवाय आयोजित या संमेलनाची दखल तब्बल ३३ वर्षांनंतर घेण्यात आली.  मागील वर्षी लोणार येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. ‘मी लोणारकर’ या समुहाने संमेलनाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर ३४व्या संमेलनाची धुरा सोलापूर येथील डॉ. मेतन फाऊंडेशनने स्वीकारली. सुरुवातीला हे संमेलन दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यात आयोजित के ले जाणार होते. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे ते पुढे ढकलण्यात आले. सोलापूर येथील डॉ. निर्मलकु मार फडकु ले सभागृहात १० व ११ एप्रिलला आयोजित या संमेलनात पक्षी, निसर्ग संवर्धन व जतन याबाबत तज्ज्ञांचे व्याख्यान, सादरीकरण होणार आहे. वरील विषयाशी निगडीत सादरीकरण, शोधनिबंध, लेख १५ मार्चपर्यंत मागवण्यात आले आहेत. या संमेलनाची संपूर्ण रुपरेषा आखण्यात आली आहे. ई-नोंदणीपासून तर दोन दिवसीय संमेलनात सहभागी पक्षीमित्रांसाठी वनविहार, माळरान भटकं ती आदी सर्व कार्यकम ठरवण्यात आले आहेत. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने आयोजकांनाही चिंतेत टाकले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला तर केवळ १०० पक्षीमित्रांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन करुन उर्वरित कार्यक्र म ऑनलाईन घेण्यात येतील. मात्र, निर्बंध आणखी कठोर झाले तर संमेलन  पुढे ढकलण्यावाचून पर्याय नाही. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नोंदणी करणाऱ्या पक्षीमित्रांकडूनही विचारणा होत आहे.

– जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षीमित्र.