नागपूर : करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही लाटेत विदर्भात करोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यू नागपूर जिल्ह्य़ात नोंदवण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेतही नागपूरची स्थिती एप्रिल २०२१ मध्ये हाताबाहेर गेली होती. ११ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्य़ात एकूण चाचण्यांच्या तुलनेत सकारात्मक (पॉझिटिव्ह) अहवालाचे प्रमाणही तब्बल ३४.८४ टक्के नोंदवले गेले होते. परंतु आता स्थिती नियंत्रणात आल्याने येथील सकारात्मक अहवालाचे प्रमाण दोन टक्क्यांहून खाली आले आहे.

नागपूरच्या शहरी भागात करोनामुळे ५ जून २०२१ पर्यंत ५,२६३, ग्रामीण २,२९७, जिल्ह्य़ाबाहेरील १,३८९ असे एकूण जिल्ह्य़ात ८,९४९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहरात ३ लाख ३१ हजार ६७९, ग्रामीण १ लाख ४२ हजार ३४६, जिल्ह्य़ाबाहेरील १,५७१ असे एकूण ४ लाख ७५ हजार ५९६ करोनाग्रस्त आढळले.

शहरात शनिवापर्यंत करोनामुक्तांची संख्या ३ लाख २४ हजार १६५, ग्रामीण १ लाख ३८ हजार १८७ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ६२ हजार ३५३ व्यक्तींवर पोहोचली. दरम्यान फेब्रुवारीपासून येथे करोनाची दुसरी लाट सुरू झाली. तर येथे २४ तासांत चाचणीचा अहवाल मिळत असल्याने आज चाचणी केल्यास दुसऱ्या दिवशीच्या रुग्णसंख्येनुसार सकारात्मक अहवाल मिळत आहे.