भाजप नेते प्रवीण दरेकर यांची टीका

नागपूर : राज्यात जनतेचे अनेक प्रश्न सुटत नसल्याने जनतेवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. जनतेचे हे प्रश्न सोडवण्याचे सोडून  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपला आवरण्यासाठी पंतप्रधानांना आर्जव करीत आहेत. त्यांची ही आर्जव म्हणजे त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ  दरकेर नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाआघाडीमधील नेत्यांमध्ये एकमत नाही. त्यामुळे योजनेची घोषणा केल्यानंतर  अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे  आंदोलन करावे लागत आहे.  मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवावे, असेही दरेकर म्हणाले. भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने नेहमी उभे आहे. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही.  केंद्र सरकारने राज्याला मोठी मदत केली  मात्र यांना यंत्रणा उभी करता येत नाही. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवतात. महाविकास आघाडी आणि फडणवीस सरकार यात खूप फरक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील, असेही दरेकर म्हणाले.

हिंमत असेल तर यादी जाहीर करा

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कारवाईसाठी भाजपच्या शंभर नेत्यांची यादी तयार असल्याचे सांगितले. मात्र हिंमत असेल तर त्यांनी तात्काळ ही यादी जाहीर करावी. राऊत केवळ बोलतात मात्र करत काही नाही. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्याकडे काही पुरावे असतील म्हणून त्यांनी आमदार सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे.

भाजपची सत्ता आल्यास लव जिहाद विरोधात कायदा

राज्यात भाजपची सत्ता आल्यास उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव जिहाद विरोधात कायदा आणला जाईल. सत्तेत आल्यापासून शिवसेनेचे काँग्रेसीकरण झालेय. त्यामुळे त्यांना आता हिंदुत्वाचा विसर पडला आहे, असेही दरेकर म्हणाले.