महापालिकेचा आरोग्य विभाग झोपेत

उपराजधानीत गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूचे १८४ रुग्ण आढळले असून महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र अद्याप झोपेतच आहे. गोधनी, झिंगाबाई टाकळी, जयदुर्गानगर, बेसा, बेलतरोडी, रामनगर, धरमपेठ, महालसह शहरातील सर्वच भागात डास वाढले आहेत. परंतु महापालिकेकडून आवश्यक फवारणी होत  नसल्याच्या तक्रारी आहेत.

उपराजधानीत जानेवारी- २०१९ या महिन्यात डेंग्यूचे २५ रुग्ण आढळले होते. त्यानंतर  या आजाराचे रुग्ण कमी झाले. आरोग्य विभागाकडून डास अळ्या शोधमोहीम राबवताना २९ शाळांतील टाक्यांमधील पाण्यात या आजाराच्या अळ्या आढळल्याने आरोग्य विभागाचेच धाबे दणाणले होते. आरोग्य विभागाने तातडीने या अळ्या नष्ट करण्याबाबत मोहीम राबवण्याची घोषणा केली. काही ठिकाणी अळ्याही नष्ट केल्या. परंतु शहरात फवारणी केली नाही.  परिणामी, सर्वत्र डास वाढून घरोघरी डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, शहरात जानेवारीपासून आजपर्यंत २०९ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात १८४ जणांचा समावेश आहे. ही संख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या आजार नियंत्रणासाठी काय करणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण वाढले असून डेंग्यूची भीती दाखवत खासगी रुग्णालये रुग्णांकडून अवास्तव शुल्क आकारत असल्याच्याही तक्रारी आहेत.

ग्रामीणमध्येही रुग्णांचे अर्धशतक

नागपूर जिल्ह्य़ातही आजपर्यंत डेंग्यूच्या पन्नासाहून अधिक रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तातडीने सर्वत्र फवारणीसह जनजागृती मोहीम हाती घेतल्याचा दावा केला जात आहे. परंतु अनेक ठिकाणी फवारणीसाठी कर्मचारी पोहचलेच नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.