राजेश्वर ठाकरे

संत्र्यावरील संशोधन होऊन फळाची गुणवत्ता वाढीस लागावी म्हणून उभारण्यात आलेल्या देशातील एकमेव केंद्रीय लिंबू वर्गीय संशोधन संस्थेला उतरती कळा लागली आहे. संशोधकांची पदे रिक्त असल्याने संशोधन आणि विकासाची वाट बिकट झाली आहे.

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशात छिंदवाडा परिसरात लागवड होत असलेल्या या संत्र्यांची गुणवत्ता वाढावी. तसेच देशात लागवड क्षेत्रासोबतच उत्पादकता वाढावी आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे याकरिता लिंबू वर्गीय फळांवर संशोधन करण्यासाठी नागपुरात सुमारे साडेतीन दशकांपूर्वी केंद्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन संस्था जन्मास आली. त्यानंतर संशोधन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे म्हणून लिंबू वर्गीय फळ तंत्रज्ञान अभियान १२ वर्षांआधी सुरू झाले. ते मार्च २०२० ला बंद करण्यात आले.

या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना रोगरहित रोपटे पुरवण्यात येत होते. तसेच बांधावर जाऊन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगण्यात येत होते. ‘टीएमसी’मार्फत दरवर्षी सुमारे सव्वातीन लाख दर्जेदार रोपे वितरित केली जात होती. हे बंद पडल्यानंतर पहिल्याच वर्षी सव्वा लाखाने रोपे कमी झाली आहेत. यावर्षी ५० ते ५५ हजार रोपे वितरित करण्याचे लक्ष्य असल्याचे संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत या संस्थेने बीजरहित संत्री विकसित केली आहे. मात्र, त्याची रोपे मुबलक उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.

अडचण काय?

संस्था सुरू झाल्यापासून जे संशोधक रुजू झाले तेवढय़ावरच संस्था सुरू आहे. संस्थेचे आसाममध्ये उपकेंद्र उघडण्यात आले. तरीही संशोधकांच्या संख्येत भर पडली नाही. त्याउलट निवृत्त संशोधकांची पदेही भरण्यात आली नाहीत. त्यामुळे आता संपूर्ण देशात आवाका असलेल्या या संस्थेत केवळ १४ संशोधक असून पुढील पाच वर्षांत त्यातील बहुतांश निवृत्त होतील. त्याचा परिणाम संत्री, मोसंबी आणि लिंबू यांच्या संशोधनावर झाला आहे. परिणामी, या फळांची नवीन वाणे येऊन अधिकाधिक उत्पादन, उत्पन्न वाढण्याचे ध्येय गाठता येणे शक्य नाही.  प्रक्रिया युनिट, इन्क्युबेशन सेंटर, पॅकेजिंग आणि मार्केटिंग सर्व युनिट कागदावर आहेत.

या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशात आहे. आसाममध्ये उपकेंद्र उघडण्यात आले आहे.  किमान २५ संशोधकांची आवश्यकता आहे. १९ पदे मंजूर असून १४ संशोधक कार्यरत आहेत.

– डॉ. एम.एस. लदानिया, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था