नागपूर महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांचा तिढा सोडविण्याकरिता स्थानिक काँग्रेस नेते मुंबईत जाऊन बसल्याने आणि कार्यकर्त्यांना मुंबईकडे डोळे लावून बसण्याशिवाय पर्याय नसल्याने उमेदवारी अर्ज भरण्याला जेमतेम चोवीस तास उरलेले असताना काँग्रेसचे कार्यालय असलेल्या देवडिया काँग्रेस भवनात शुकशुकाट होता.

राजकीय पक्षाकरिता निवडणूक ही प्राणवायूसारखी काम करीत असते. त्यामुळे निवडणूक कोणतीही आणि कुठल्याही स्तरावरची असो, निवडणूक काळात पक्ष कार्यालयात वर्दळ असते. हे सूत्र मात्र गेली ६० वषार्ंत देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसला लागू होताना दिसत नाही. मागील दोन निवडणुकीत नागपूरच्या सत्तेपासून दूर असताना देखील कार्यकर्ते निवडणुकीच्या काळातही सैरभर झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नेते मुंबईत आणि कार्यकर्ते आपापल्या घरी, असे चित्र आज होते. चिटणीस पार्कजवळील देवडिया काँग्रेस भवनाने अशा प्रकारचा शुकशुकाट कधी बघितलेला नसेल. महापालिकेची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवार आपापल्या नेत्यांकडे नजरा लावून बसले आहेत. परंतु ऐन निवडणुकीच्या काळात देवडिया भवनाला गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कुलूप लावले होते. काँग्रेस कार्यालयात ना कार्यकर्ते होते आणि कुणी पदाधिकारी होता.

स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड मतभेद आहेत. कार्यकर्त्यांना त्यांच्यातील दरी स्पष्ट जाणवते. त्यामुळे शहरातील काँग्रेस अनेक गटातटात विभागली आहे. देशात, राज्यात आणि शहरात काँग्रेसची शक्ती क्षीण झाली आहे. मात्र अनेक वर्षांपासून सत्तेत राहून तृप्त झाल्याने अजूनही त्याचा अंदाज घेणे जमत नसल्याचे हे लक्षण आहे.

शहर काँग्रेस कार्यकारिणीवरून निर्माण झालेला वाद निवडणुकीतील उमेदवारी वाटपावरून कायम आहे. त्यामुळे नागपुरातील मतदार यादी निश्चित करण्यासाठी तीन दिवस नेत्यांना मुंबईत तंबू ठोकावे लागले. त्यानंतरही स्थानिक नेत्यांच्या गटांचे समाधान झालेले नाही. हा सारा प्रकार मुंबईत सुरू असताना इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते नेते नागपुरात येण्याची वाट पाहत घरी बसले होते. यामुळे काँग्रेससारख्या सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला कुलूप लावण्याची वेळ आली, असे काँग्रेसच्याच ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.