धरमपेठ शिक्षण संस्थेत अध्यक्षांची मनमानी, तुपकरींचा आरोप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारकांच्या डोक्यात सत्तेची नशा चढायला लागली आहे. आताच्या प्रचारकांमध्ये हुकूमशाही प्रवृत्ती बळावली असल्याचा आरोप डॉ. रामचंद्र तुपकरी यांनी धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवी जोशी यांच्यावर करून संघाला घरचा आहेर प्रदान केला. संघाचे क्षेत्रीय प्रचारक जोशी संस्थेचे अध्यक्ष झाल्यापासून कायदे व नियमांची पायमल्ली करणे, हुकूमशाही गाजवणे, कार्यकारिणी सदस्यांचे पायउतार करण्यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. एवढेच नव्हे तर आमसभा सुरू असताना ‘तुम्हाला पाहून घेईल’, अशा धमक्या अनेकवेळा दिल्या आहेत.
संस्थेच्या अध्यक्ष व सचिवामुळे संस्थेच्या उज्ज्वल इतिहासाला गालबोट लागल्याची खंत स्वयंसेवक करीत आहेत. संघ स्वयंसेवकांनी चालवलेली व नावारूपास आणलेली संस्था म्हणून धरमपेठ शिक्षण संस्थेचा उल्लेख होतो. संस्थेची आमसभा १८ सप्टेंबर २०१५ ला आयोजित करण्यात आली. त्यात आधीच्या आमसभेचे इतिवृत्त अध्यक्ष व सचिवांच्या खोटारडेपणामुळे बहुमताने फेटाळण्यात आले. तेव्हा सभा तहकूब करण्याशिवाय पर्यायच नव्हता. इतिवृत्त फेटाळले जाणे हा कार्यकारिणीवरील आणि विशेषत्वाने अध्यक्ष व सचिवावरील अविश्वास दर्शवतो. अशावेळी अध्यक्ष व सचिवाने राजीनामा देण्याऐवजी त्यांच्या हुकूमशाहीचा सामना नेहमीच सदस्यांना करावा लागतो.
दुसरे म्हणजे अर्थ वर्ष २०१५-१६चे अंदाजपत्रक आमसभेत मंजूर करून घेणे आवश्यक असताना त्यासाठी आमसभेची मान्यता अध्यक्षांनी घेतली नाही.
आर्थिक वर्ष २०१५-१६ संपल्यावर ५ एप्रिल २०१६ला पुन्हा आमसभा बोलावून अंदाजपत्रकाचा प्रस्ताव सभेत ठेवण्यात आला. त्यावर डॉ. तुपकरी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, अध्यक्ष व सचिवांनी ‘हरकतीचा मुद्दा मान्य नाही’, असे चिडून सांगितले. त्यावेळी दोघांनीही हुकूमशाहीचे प्रदर्शन केले. कारण १८ सप्टेंबरच्या आमसभेतील अपमान त्यांना जिव्हारी लागला होता. अध्यक्ष रवी जोशी यांनी एक बौद्धिक वर्गच यावेळी घेतला आणि त्यांचाच कित्ता सचिवांनीही गिरवला. हे सर्व असह्य़ झाल्याने डॉ. तुपकरी यांनी सभात्याग केला.
दरम्यान, अध्यक्षांनी मोठय़ाने बोलणे सुरू असतानाच ‘तुम्हाला पाहून घेईल’, अशी धमकी अध्यक्षांनी अनेकदा दिली.
तसेच संघाचे क्षेत्र-प्रचारक म्हणून मिळालेली बढती ज्यांना आवडली नाही तेच लोक त्यांच्याविरुद्ध कट-कारस्थाने करीत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. संघ प्रचारकाच्या डोक्यात सत्तेची नशा चढली असून अशा हुकूमशाही प्रवृत्तीच्या प्रचारकांच्या संघात आज्ञाधारकांनाच राहणे शक्य असल्याची अगतिकता डॉ. तुपकरी यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात जोशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. लघुसंदेशाद्वारे त्यांना आमसभेदरम्यान घडलेला प्रकाराची माहिती विचारण्यात आली. मात्र, त्याबाबतही त्यांनी उत्तर देणे टाळले.

हे कसले क्षेत्रीय प्रचारक?
रवी जोशी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्याचे क्षेत्रीय प्रचारक म्हणून समन्वय साधणार! ज्यांना साधे संस्था चालवण्याचे नियम व कायदे माहीत नाहीत ते त्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना सरकार चालवण्याचे सल्ले देणारे काय? अशी उपरोधिक टीका डॉ. तुपकरी यांनी केली. त्यांना संस्थेचे संघ स्वयंसेवक म्हणून स्वाभिमान असणाऱ्यांशी समन्वय साधता येत नाही ते धकाधकीच्या राजकारणात काय समन्वय साधणार? संघ प्रचारकांच्या डोक्यात सत्तेची नशा चढायला लागली आहे. त्यांचे न ऐकणाऱ्यांना संघाबाहेर हाकलेले जात आहे.