प्रकाश मानकरला फुटाळयावरून अटक; फरार काळात दिल्लीत मुक्काम

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केल्यानंतर माफिया संतोष शशिकांत आंबेकर हा फरार झाला. या काळात त्याने मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, गणपतीपुळे येथील प्रसिद्ध गणेश मंदिर, अजमेर येथीर दर्गा, शिर्डी येथे साई मंदिरात दर्शन घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर तो बुधवारी सकाळी ११.३० वाजता सोनेगावच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात शरण आला. फरारी काळात तो दिल्ली, मुंबई आणि अजमेर येथे फिरत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

युवराज ठुनिया माथनकर (३५, रा. बेलतरोडी) हा १८ जानेवारीला दुपारी २ च्या सुमारास आपल्या ३० ते ४० जणांसोबत स्वप्नील सुरेश बडवई रा. १९ गजानन धाम, सहकारनगर यांच्या घरात शिरला होता. यावेळी त्यांनी स्वप्नील यांना घर रिकामे करण्यासाठी सुरक्षा भिंत आणि घराच्या पायऱ्याची तोडफोड केली. त्यानंतर घर रिकामे नाही केले तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी २७ जानेवारीला प्रकरणातील आरोपींविरुद्ध मोक्का लावला. या टोळीचा म्होरक्या संतोष आंबेकर असून त्याच्याविरुद्धही मोक्का लावण्यात आला. आतापर्यंत युवराज माथनकर, सचिन जयंता अडुळकर (३०, रा. दिघोरी), विजय मारोतराव बोरकर (३५, रा. दिघोरी), शक्ती संजू मनपिया (३३, रा. शिवहाईट्स, बेलतरोडी), आकाश किशोर बोरकर (३१, रा. कामगार कॉलनी, सुभाषनगर), विनोद भीमा मसराम (३२, रा. टेम्पल बाजार रोड), संजय फातोडे, आणि लोकेश दिलीप कुभीटकर (२८, रा. विद्यानगर, कोराडी रोड) यांना अटक करण्यात आली होती. तर संतोष आंबेकर (४०, रा. इतवारी), प्रकाश चिंतामन मानकर (३०) आणि गौतम किसन भटकर (३८, रा. गोपालनगर) हे फरार होते. त्यापैकी संतोष आंबेकरने आज सकाळी ११ वाजता सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर तोरे यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले. प्रकाश मानकर याला फुटाळा परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी संतोषची संपत्ती गोठविण्याची प्रक्रिया प्रारंभ केल्याने तो पोलिसांसमोर हजर झाला, अशी माहिती पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात आता केवळ गौतम भटकर हा आरोपी फरार आहे. लवकरच त्यालाही अटक करण्यात यश येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर तोरे उपस्थित होते.

मदतनीसांवरही कारवाई

कुख्यात गुंड संतोष आंबेकरला फरार होण्यास आणि त्याला विविध शहरांमध्ये आश्रय देणाऱ्या इतर टोळींविरुद्ध किंवा पांढरपेशे गुन्हेगारांविरुद्धही पोलीस कारवाई करतील. काहींची नावे स्पष्ट झाली असून त्याची शहानिशा केल्यानंतर लवकरच त्यांना अटक करण्यात येईल आणि त्यांच्याविरुद्ध मोक्का लावण्यात येईल, असेही बलकवडे म्हणाले.