* बिल वसूल करणारे तोतया कर्मचारी सक्रिय
* थकबाकीदार ग्राहकच लक्ष्य

उपराजधानीत वीज ग्राहकांना लुटणारे तोतया कर्मचारी सक्रिय झाल्याची माहिती आहे. हे भामटे थकबाकी असलेल्या ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांना कंपनीचे बनावट ओळखपत्र दाखवतात. ग्राहकांना वीज पुरवठा खंडित करण्याची तंबी देऊन थकित बिलाची रक्कम घेतली जाते. थकबाकी वाढल्यावर वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्यावर हा प्रकार ग्राहकांच्या निदर्शनात येत आहे. ‘एसएनडीएल’सह महावितरणकडे अशा तक्रारी वाढल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

महाल, गांधीबाग, सिव्हील लाईन्स या तीन विभागातील ५ लाख ९ हजारांच्या जवळपास वीज ग्राहकांना ‘एसएनडीएल’ या खासगी फ्रेंचायझीच्या वतीने तर इतर भागात महावितरणच्या वतीने वीज पुरवठा केला जातो. ग्राहक वापरत असलेल्या विजेचे बिल ग्राहकाला प्रत्येक महिन्याला महावितरणच्या सॉफ्टवेअरमध्येच तयार करून दिले जाते. वीज बिल वेळेवर वाटप करण्याची जबाबदारी महावितरण व एसएनडीएल या दोन्ही फ्रेंचायझीची आहे. हे काम दोन्ही कंपन्या खासगी कंत्राटदारांकडून करून घेतात. सोबत या दोन्ही वीज कंपनीच्या हद्दीत अखंडित वीज सेवा देण्याकरिता कायम कर्मचाऱ्यांसह बाह्य़स्त्रोतांच्या माध्यमातून कंत्राटदारांकडून कर्मचारी घेऊन सेवा दिली जाते. शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘एसएनडीएल’सह महावितरणच्या हद्दीत वीज कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांना लुटण्याकरिता लक्ष्य केले जात असल्याचे पुढे आले आहे. या ग्राहकाकडे वीज कंपनीचे तोतया कर्मचारी विविध विजेचे साहित्य असलेली सामग्री घेऊन पोहचतात. ते स्वत: वीज कर्मचारी असल्याचे भासवतात. ग्राहकाला तुमच्याकडे वीज बिलाची इतकी रक्कम थकित असून वीज पुरवठा खंडित करण्याकरिता आल्याचे सांगतात. संबंधित ग्राहक पुरवठा खंडित होऊ नये म्हणून तातडीने काही रकमेची व्यवस्था कडून तोतया कर्मचाऱ्यांच्या हाती देतात. ग्राहकाच्या वीज बिलावर पेडचा शिक्का मारून सही करून हे कर्मचारी निघून जातात. ग्राहकाला वीज बिलाची थकित रक्कम काही प्रमाणात भरल्यामुळे आता वीज पुरवठा खंडित होणार नसल्याचे समाधान मिळते. परंतु काही दिवसांत वीज बिलाची थकबाकी वाढल्यावर खरे कर्मचारी वीज पुरवठा खंडित करण्याकरिता घरी पोहोचतात. तेव्हा तोतया कर्मचाऱ्यांकडून शहरात हे कृत्य सुरू झाल्याचा प्रकार एसएनडीएल या वीज कंपनीच्या निदर्शनात आला. महावितरणच्याही हद्दीत हा प्रकार घडत असल्याचे वीज ग्राहकांचे म्हणणे आहे. एसएनडीएलकडे अशा स्वरूपाच्या तक्रारी येणे सुरू झाले असून काही ग्राहकांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्याची माहिती आहे.

निलंबित,  बडतर्फ कर्मचाऱ्यांवर संशय

‘एसएनडीएल’सह महावितरणच्या हद्दीत वीज ग्राहकांकडे किती थकबाकी आहे, ही माहिती वीज कर्मचाऱ्यांना कळणे शक्य आहे. तेव्हा या घटनेमध्ये दोन्ही कंपन्यातील निलंबित, बडतर्फ, सेवा सोडलेल्या कर्मचाऱ्यांचाच सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या टोळीला कर्मचाऱ्यांकडूनही माहिती पुरवल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

अधिकृत वीज भरणा केंद्रातच रक्कम भरा

शहरात वीज कंपनीचे कर्मचारी भासवून ग्राहकांकडून थकित बिलाची रक्कम काही तोतया कर्मचारी वसूल करत असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात तक्रारी करण्याच्या सूचना दिल्या आहे. वीज ग्राहकांनी अशा कोणत्याही कर्मचाऱ्यांना थकित बिलाची रक्कम न देता वीज कंपनीच्या अधिकृत बिल भरणा केंद्रातच रक्कम भरावी, असे आवाहन महावितरणच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.