07 August 2020

News Flash

बॉयलर स्फोटात पाच जणांचा मृत्यू

नागपूरजवळील बेला येथील दुर्घटना

संग्रहित छायाचित्र

बेला येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत शुक्रवारी बॉयलरचा स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कामगारांनी सुरक्षा आणि नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित करून कारखान्यात गर्दी केली आणि मृतदेह अडवून ठेवले. अखेर मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरीचे आश्वासन कंपनीने दिल्यानंतर तणाव निवळला.

दुर्घटनेतील मृतांची नावे मंगेश प्रभाकर नौकरकर (२१), लीलाधर वामनराव शेंडे (४२), वासुदेव विठ्ठल लडी (३०), प्रफुल्ल पांडुरंग मून (२५) आणि सचिन प्रकाश वाघमारे (२४) अशी आहेत. ते सर्व वडगाव येथील रहिवासी होते.

बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल गडकरी यांचा ‘मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज’ हा साखर कारखाना आहे. पूर्वी हा कारखाना पूर्ती या नावाने ओळखला जात होता. शनिवारी कारखान्याचे उत्पादन सुरू होते. त्याच वेळी एका बॉयलरच्या टाकीची दुरुस्तीही सुरू होती. अनेक दिवसांपासून ही टाकी बंद होती. तिची दुरुस्ती जोडतंत्री (वेल्डर) सचिन आणि इतर मदतनीस करीत होते. त्या वेळी म्हणजे दुपारी २.१५ वाजता बॉयलरचा स्फोट झाला आणि पाच मजुरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर कारखान्यातील सर्व कामगार एकत्र जमले आणि त्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. व्यवस्थापनाने पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर आमदार राजू पारवे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार दुर्घटनास्थळी दाखल झाले. संतप्त कामगारांना पांगवण्यासाठी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली.

संध्याकाळी कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि कारखाना व्यवस्थापनात वाटाघाटी होऊन तणाव निवळला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदन रविवारी करण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

१५ लाखांची मदत, एकाला नोकरी

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत करण्यात येईल आणि कुटुंबातील एकाला कारखान्यात नोकरी दिली जाईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले. त्यामुळे संतप्त कामगार शांत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुर्घटनेत पाच कामगारांना जीव गमवावा लागला, हे दुदैवी आहे. या दु:खद प्रसंगी कारखाना प्रशासन मृत कामगारांच्या कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

– नितीन कुळकर्णी, जनसंपर्क अधिकारी, मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:38 am

Web Title: five killed in boiler explosion abn 97
Next Stories
1 एसटीसाठी शासनाकडे दोन हजार कोटींची मागणी
2 ‘जीपीएस’ लावलेल्या आफ्रिकेतील पक्ष्याचा महाराष्ट्रात मृत्यू
3 टाळेबंदीच्या संभ्रमामुळे अफवांचे पेव
Just Now!
X