News Flash

माजी प्रशासकीय अधिकारी  राम खांडेकर यांचे निधन

यशवंतराव ते नरसिंह राव अशी सलग पाच दशके सत्तेच्या वर्तुळात प्रशासकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते.

राम खांडेकर यांनी लोकसत्तासह विविध वर्तमानपत्रं, मॅगझिनमध्ये लिखाणही केलं होतं.

नागपूर : माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष कार्याधिकारी (ओएसडी) म्हणून दीर्घकाळ कार्यरत राहिलेले आणि आपल्या कार्याची वेगळी छाप उमटवणारे राम खांडेकर यांचे मंगळवारी रात्री दीर्घ आजाराने नागपुरात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

यशवंतराव ते नरसिंह राव अशी सलग पाच दशके सत्तेच्या वर्तुळात प्रशासकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लेखनकार्य..

खांडेकर यांनी महाराष्ट्रातील अनेक दैनिकांमध्ये महत्त्वपूर्ण लेखन केले. सार्वजनिक जीवनातील विस्तीर्ण अनुभवाच्या आधारे खांडेकर यांनी ‘लोकसत्ता’साठी साप्ताहिक स्तंभलेखन केले. हेच लेखन राजहंस पब्लिकेशनच्या ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाले आहे.

अल्पचरित्र…

३ सप्टेंबर १९३४ मध्ये नागपूरला जन्मलेले रामचंद्र केशवराव उपाख्य राम खांडेकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोेकरीची सुरुवात नागपुरातूनच केली. १९५६ मध्ये झालेल्या भाषिक राज्याच्या निर्मितीमुळे खांडेकर यांची बदली त्या वेळच्या मध्य प्रदेशच्या नागपूर राजधानीतून मुंबईला झाली. १३ ऑक्टोबर १९५८ला त्यांची नियुक्ती द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मराठी स्टेनोग्राफर म्हणून झाली. नोव्हेंबर १९६२ला भारत-चीन युद्धाच्या वेळी यशवंतराव संरक्षणमंत्री झाले तेव्हा त्यांनी खांडेकर यांना दिल्लीला नेले. १९७७ साली काँग्रेसची सत्ता जाऊन जनता पक्षाचे राज्य आले तेव्हा खांडेकर यांनी मोहन धारिया यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९८१ साली पुन्हा काँग्रेसचे राज्य आल्यानंतर दिवंगत वसंतराव साठे यांचे ते खासगी सचिव झाले. ३ जानेवारी १९८५ मध्ये नरसिंह राव रामटेक मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी खांडेकरांना आपला खासगी सचिव केले. १९८९ मध्ये नरसिंह राव सत्तेवर नसतानाही खांडेकर यांनी त्यांचे काम बघितले. १९९१ मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर त्यांचे स्वीय सचिव होते. नरसिंह रावांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी त्यांची साथ न सोडता अखेरपर्यंत काम केले.

प्रदीर्घ राजकीय कालखंडाचा साक्षीदार निवर्तला

राम खांडेकर यांना मान्यवरांची श्रद्धांजली

नागपूर :  दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केलेल्या राम खांडेकर यांच्या निधनाने एक कुशल व प्रामाणिक प्रशासक व  प्रदीर्घ राजकीय कालखंडाचा साक्षीदार गमावला आहे, अशा शब्दात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

व्यापक जनसंपर्क आणि समृद्ध अनुभवातून खांडेकर हे त्या-त्या काळातील नेत्यांचे सल्लागार बनले होते. काम करताना आलेले अनुभव त्यांनी पुस्तकांतून, विविध वृत्तपत्रांतील लेखमालांमधून शब्दबद्ध केले. खरे तर त्या कालखंडातील हा एक मोठा इतिहास आणि संदर्भ सांगण्याचे काम त्यांनी केले. केवळ चिकाटी, सातत्य आणि कर्तव्यदक्षतेतून एक मोठा प्रवास त्यांनी साध्य केला होता.

देवेंद्र फडणवीसविरोधी पक्षनेते, विधानसभा

 

साधेपणा, नम्रतेचे प्रतीक

राम खांडेकर हे विश्वासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व होते. उच्च पदावर काम करीत असताना अत्यंत साधेपणा, नम्रता आणि शालिनता त्यांनी कधीही सोडली नाही. दिवं. नरसिंहराव यांचे ते अत्यंत विश्वासू होते. केंद्रातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांना माझी विनम श्रद्धांजली.

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.

महाराष्ट्रातील नेत्यांचे दूत

१९८५ मध्ये नरसिंहराव रामटेकमधून निवडणूक लढले त्यावेळी त्यांना एका मराठी माणसाची गरज होती. त्यांनी राम खांडेकर यांची निवड केली. नरसिंहराव पंतप्रधान असताना मतदारसंघातील कुठल्याही नेत्याचे काम असेल तर त्यांच्या माध्यमातून ते नरसिंहराव यांच्याकडे  जात. ते महाराष्ट्रातील नेत्यांचे दूत होते. त्यांना काँग्रेस संस्कृतीची माहिती होती. त्यामुळेच त्यांनी दिल्लीच्या राजकारणात  आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

विलास मुत्तेमवार, माजी खासदार.

खांडेकरांचे सल्ले दूरगामी ठरले

राजकीय क्षेत्रात कुशल नेतृत्व आणि प्रशासक म्हणून राम खांडेकर यांच्याकडे बघितले जात होते.  दिल्लीतील सत्तेच्या वर्तुळात त्यांनी आपल्या कामाची चांगली छाप पाडली. अनेक संवेदनशील विषयांवर त्यांनी दिलेले सल्ले  दूरगामी ठरले. सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात राहून त्यांनी जीवनमूल्ये अखेपर्यंत जपली. त्यांच्या निधनाने एक कुशल व प्रामाणिक प्रशासक गमावला आहे.

डॉ. नितीन राऊत, पालकमंत्री.

एका युगाचा अंत

व्यापक जनसंपर्क असलेले, माजी पंतप्रधान स्व.नरसिंहराव यांच्यासह अनेक मान्यवरांचे स्वीय सहाय्यक किंवा विशेष कार्य अधिकारी म्हणून काम बघणारे रामभाऊ  खांडेकर यांच्या निधनाने एक उत्तम प्रशासक गमावला आहे.  अनेक नेत्यांसोबत त्यांनी संपर्क अधिकारी म्हणून काम केले. त्यांनी आपले अनुभव लेखनातून समाजाला सांगितलेले. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला.

दयाशंकर तिवारी, महापौर.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 4:35 am

Web Title: former prime minister pv narasimha raos osd ram khandekar passes away zws 70
Next Stories
1  ‘त्या’ विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण शुल्कासाठी ३५ कोटींचा प्रस्ताव
2 म्युकरमायकोसिसच्या ४ हजार रुग्णांसाठी २३ हजार इंजेक्शन
3 प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक मेडिकलमध्ये
Just Now!
X