27 October 2020

News Flash

मिळे सहानुभूतीचा मळा, तीव्र न भासती उन्हाच्या झळा ..!

मराठवाडय़ात पाण्याची कमतरता तर विदर्भात उन्हाच्या झळा आहेत.

वाढत्या उन्हात अंगाची काहिली होत असताना त्याचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसतो आहे. अलीकडच्या काळात नागरिकांची पक्ष्यांविषयीची सहानुभूती वाढायला लागली आणि पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था ते करायला लागले आहेत. त्यांच्या या करण्यामागे आत्मियता आहे, पण कुठेतरी त्यात त्रुटी राहिल्याने किंवा मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही. त्यांच्या कळकळीच्या प्रयत्नातून यश मिळत असले तरी अपयशाची थोडी किनार अजूनही आहे. एक मात्र खरे की, गेल्या काही वषार्ंतील या जनजागृतीने उन्हाळयात पक्ष्यांना बसणाऱ्या फटक्याची तीव्रता कमी झाली आहे.

मराठवाडय़ात पाण्याची कमतरता तर विदर्भात उन्हाच्या झळा आहेत. उन्हाळयाची चाहूल लागताच दोन्ही प्रदेशातील पक्ष्यांना त्याचा फटका बसतो. पाण्याची कमतरता आणि उन्हाचा तडाखा यामुळे पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण उन्हाळयाच्या कालावधीत अधिक भासते. तापमानाच्या पाऱ्याने पंचेचाळीशी गाठल्यानंतर अन्न, पाणी आणि थंडाव्याच्या शोधात असलेला पक्षी त्याला बळी पडतो. माणसांच्या या गरजा पूर्ण होतात. रस्त्यावरचा माणूसही कशीरी आपली व्यवस्था करतो. पक्ष्यांना मात्र ते करता येत नाही. म्हणूनच अलीकडच्या काळात पक्ष्यांची तडफड माणसांनाही पाहावेनाशी झाली आणि स्वत:च्या काळजीसोबत पक्ष्यांची जबाबदारीसुद्धा त्यांनी घेतली. त्यातूनच आता शहरातील जवळपास प्रत्येकच घरात पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याची सोय केली जाते. उन्हाच्या काहिलीमुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकणे, शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी झाल्यामुळे उडता न येणे यासारखे प्रकार होतात. सिमेंटची बंदद्वार घरे आणि कापले जाणारे झाड यामुळे त्यांचा निवारा त्यांच्यापासून हिरावला जातो.

शहरातली हिरवळ आणि पाण्याचे कमी होत चाललेले स्त्रोत यामुळेही उन्हातल्या भटकंतीशिवाय पर्याय उरत नाही. पक्ष्यांचा निवारा हिसकावून घेण्यात काही प्रमाणात नागरिक जबाबदार असले तरीही त्यांनीच आता पक्ष्यांसाठी काळजीही घेतली आहे.

विशेष म्हणजे शाळांमधूनही पर्यावरण, निसर्ग यासारखे विषय विद्यार्थ्यांना शिकवले जात असल्याने घरापासून त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली आहे. मुलांच्या आग्रहाखातर पालकांनी घरी पक्ष्यांसाठी पाणी, दाणे असे प्रयोग राबवण्यास सुरुवात केली. फक्त या गोष्टी करताना कोणत्या वस्तूंचा वापर केला जावा, एवढया मार्गदर्शनाची मात्र त्यांना गरज आहे.

पक्षी आणि विशेषत: चिमण्यांच्या बाबतीत असे बोलले जाते की भ्रमणध्वनी टॉवर्समुळे त्यांच्यावर परिणाम होत आहे. मुळात त्याचा इतकाही परिणाम होत नाही. घरांच्या बदललेल्या रचनांमुळे त्यांची घरटी करण्याची ठिकाणे हरवल्या गेली. त्याचा सर्वाधिक फटका त्यांना उन्हाळयात बसला. मात्र, गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये आलेल्या जनजागृतीबद्दल त्यांना शाबासकी द्यायला हवी. पक्षी जखमी झाला, पक्षी पडला यासंदर्भातील अनेक दूरध्वनी आमच्याकडे येतात, पण तो करण्यापूर्वीच इंटरनेटचा आधार घेत लोकांनी त्या जखमी पक्ष्यांवर प्रथमोपचार केल्याचीसुद्धा अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच अलीकडच्या काळात उन्हाळयातील पक्ष्यांच्या मृत्यूची संख्या बरीच कमी झाली आहे, असा निष्कर्ष ‘आयसॉ’ या संस्थेचे प्रमोद कानेटकर यांनी काढला आहे.

पर्यावरणाचा विचार करताना संवर्धनासाठी होणारे प्रयत्नही पर्यावरणपुरक असावे. अनेकांनी आता पक्ष्यांसाठी घरटी किंवा त्यांच्या अन्नासाठी भांडी तयार करताना प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे. प्लास्टिकच्या डबक्या, पिशव्यांपासून ते तयार करतात, पण प्लास्टिकमध्ये पक्ष्यांना आवश्यक तापमान राखले जाते का, हेही पाहणे गरजेचे आहे. ही प्लास्टिकची साधणे उन्हात असतील तर तापमान वाढून पक्ष्यांची अंडी खराब होण्याचा संभव असतो. अशावेळी कृत्रिम घरटी तयार करताना लाकूड किंवा पर्यावरणपुरक साधनांचाच वापर व्हावा. त्यांच्या अन्नासाठी आणि पाण्यासाठी मातीची भांडीच वापरली गेली पाहिजे. त्यामागचे आणखी एक कारण म्हणजे मातीच्या भांडय़ाचे वजन अधिक असल्याने पक्ष्यांनी हालचाल केली तरीही ते पडत नाही. शिवाय पाणीही थंड राहते. याउलट प्लास्टिकची भांडी हलकी असल्याने पक्ष्यांच्या हालचालीमुळे ती पडण्याचा संभव असतो आणि पाणीही गरम होते, अशी माहिती पक्षी अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 4:16 am

Web Title: hit wave harmful to human beings
Next Stories
1 ‘पर्यावरणाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्यानेच दुष्काळी स्थिती’ – मुख्यमंत्री
2 पंकजा मुंडे यांचा उत्साहाच्या भरात सेल्फी ; भाजपचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांचे मत
3 कुठे टंचाई तर कुठे नासाडी!
Just Now!
X