इन्फोसिस परिसरात पुन्हा वाघ आढळला

उपराजधानतील महत्त्वाकांक्षी व मोठय़ा तीन प्रकल्पांपैकी एक असलेला मिहानचा परिसर गेल्या १५ दिवसांपासून वाघाच्या दशहतीत आहे. चार दिवसांपूर्वी जंगलाच्या दिशेने वळलेला वाघ गुरुवारी पुन्हा मिहानमध्ये परतल्याने असुरक्षित वातावरणात अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. दरम्यान, अंबाझरी जैवविविधता उद्यान परिसरात गुरुवारी सकाळी बिबटय़ाच्या पावलांचे ठसे आढळून आले होते. मात्र त्याचाही शोध आज लागला नाही.

शहरापासून अवघ्या २० किलोमीटरवरील मिहान ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी याठिकाणी मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, परिसरात वाघ दिसल्याने असुरक्षित वातावरण तयार झाले आहे. १५ दिवस होऊनही वाघाला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यात वनखात्याला अपयश आले आहे. २९ नोव्हेंबरला पुन्हा हा वाघ इन्फोसिस कंपनीच्या मागील भागातील वाढलेल्या गवतात नाल्याच्या दिशेने आढळून आला. त्यामुळे कंपन्यांनी आता याठिकाणी झाडेझुडपे सफाईला सुरुवात केली आहे. वनखात्याचे गस्ती पथक आणि वनविभागाचे व मिहानचे कर्मचारी संरक्षणाच्यादृष्टीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहेत.

औद्योगिक वसाहत परिसरात भीतीचे वातावरण कंपन्यांसाठी व त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मारक ठरते. तसेच येथे येऊ घातलेल्या इतरही कंपन्यांसाठीही ही बाब प्रतिकूल ठरते हे येथे उल्लेखनीय.

‘‘मिहानमध्ये १४२ एकर पडीक जागा असून  झाडेझुडपे वाढलेली आहेत. परिसरातच तलाव आणि नाला असल्याने वन्यप्राण्यांसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे  वाघ सिमेंटच्या रस्त्यांवर तो येण्याची शक्यता कमीच आहे. मिहानमधील कंपन्यांमध्ये येणारे ८० टक्के अधिकारी, कर्मचारी कंपनीच्या बसने येतात. तर काही जण त्यांच्या स्वत:च्या चारचाकी वाहनाने येतात. सुरक्षा रक्षक मात्र दुचाकीने येत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तरीही सर्व कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनखात्याची चमूही याठिकाणी रात्रंदिवस गस्त करत आहे.’’ – दीपक जोशी, जनसंपर्क अधिकारी,

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.

‘‘चार दिवसांपूर्वी गावाकडे वाघ आला होता, पण दोन दिवसांपासून तो कुणालाही दिसला नाही. कपाशीच्या झाडांमुळे  वाघ शेतात असला तरी दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यासाठी भीत आहेत. वनखात्याची माणसे त्यांच्या वाहनाने येतात आणि जातात. ते गस्त घालत असले तरीही शेतकऱ्यांमध्ये भीती कायम आहे.’’ – ईश्वर रंगारी, शेतकरी सुमठाणा