राज्यात लाखो अभियांत्रिकीच्या जागा रिक्त असल्याने या क्षेत्रात रोजगार संधी नाहीत, असा प्रचार सुरू असतानाच रासायनिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आयआयएमच्या तोडीचे पॅकेज मिळाल्याने सुखद धक्का बसला आहे. प्रणव बानाबाकोडे, मोहिनी पाचोडकर आणि निधी पालोद तीन विद्यार्थ्यांनी सर्वाधिक रकमेचे पॅकेज पटकावले.

बी.टेक.चे दरवर्षीचे शुल्क केवळ २४ हजार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संस्थांच्या विद्यार्थ्यांचे लाखो रुपयांचे प्रवेश शुल्क पाहता एलआयटीच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे.

नागपुरातील लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्था ही मध्य आशियातील रासायनिक अभियांत्रिकीतील आघाडीची संस्था असून येथील ९० टक्के विद्यार्थ्यांना पदवी स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. उर्वरित १० टक्के विद्यार्थी संशोधन क्षेत्राकडे वळतात. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या दोन-तीन वर्षांपासून मुलीही त्यांच्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवत आहेत. गेल्यावर्षी संस्थेचे रासायनिक अभियांत्रिकीमधील सर्वात जास्त १२ लाखांचे पॅकेज मिळवणारी मुलगीच होती. यावर्षी सर्वाधिक १७.५० लाखाचे पॅकेज या तिन्ही विद्यार्थ्यांना प्राप्त झाले असल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. भारत पेट्रोलियमने परिसर मुलाखतीतून १७.५० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज आधीच घोषित केले होते. या तिघांची लेखी परीक्षा २८ एप्रिलपासून सुरू होत आहे. नुकत्याच प्रात्यक्षिक परीक्षा आटोपल्या आहेत. मुंबईच्या किंवा केरळमधील कोची येथील बीपीसीएलच्या तेल शुद्धिकरण कारखान्यात त्यांना काम करण्याची संधी मिळेल. त्यांची निवड झाल्याचे तात्पुरते ‘ऑफर लेटर’ त्यांना मिळाले असून तिघांचीही वैद्यकीय तपासणी झाली आहे. या तिघांचीही प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांना संधी

प्रणवचे वडील राजीव  कंत्राटदार असून आई नलिनी गृहिणी आहेत. प्रणवला रासायनिक अभियांत्रिकीच्या क्षेत्रातच पुढे जाण्याची इच्छा आहे. विद्यार्थ्यांची मेहनत घेण्याची तयारी असेल तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगल्या संधी प्राप्त करू शकतात. एलआयटीमधील प्राध्यापक आणि संचालकांमुळे नोकरीच्या फारच चांगल्या संधी उपलब्ध होतात. शिवाय रासायनिक अभियांत्रिकीशी संबंधित कंपन्यांनाच याठिकाणी पाचारण केले जाते.

खूप काही करायला वाव

निधीचे वडील पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, तर आई कविता गृहिणी आहेत.  रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील कारकिर्र्दीची सुरुवातच एवढय़ा मोठय़ा पॅकेजने झाल्याने तिला व तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. पुढे जाऊन याच क्षेत्रात मोठय़ा संधी असल्याने स्पर्धा परीक्षांचा विचारही डोक्यात आला नाही, असे निधी म्हणाली. एलआयटीमध्ये खूप काही करायला वाव मिळाल्याचे ती म्हणाली.

मोहिनीला १७.५० लाखाचे पॅकेज

रासायनिक अभियंता बनण्याचे स्वप्न असलेल्या मोहिनी पाचोडकर हिनेही १७.५० लाखाचे पॅकेज मिळवले. ती मूळची अमरावती जिल्ह्य़ातील धारणी तालुक्यातून आली आहे.  वडील प्रकाश शिक्षक असून आई निर्मला गृहिणी आहे. वसतिगृहात राहून तिने हे यश संपादित केले. दरवर्षी आठ ते नऊ लाखाचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळते. कंपनीने १७.५० लाखाच्या पॅकेजसाठी निवड केली. तेव्हा आश्चर्याचा धक्का बसल्याचे ती म्हणाली. कंपनी केरळमधील कोची किंवा मुंबईच्या तेल शुद्धीकरण कारखान्यात काम करण्याची संधी देऊ शकते. दोन्ही पैकी जे मिळेल, तेथे जाण्याची तयारी मोहिनीने दर्शवली आहे.

विद्यार्थ्यांची चांगले यश मिळवलेच. शिवाय त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचेही हे मोठे यश आहे. शिवाय इतर विद्यार्थ्यांनाही मिळालेली पॅकेजेस कमी नाहीत. सरासरी पॅकेज ५.५ लाखांचे आहे. कदाचित राज्यातील सर्वात मोठे पॅकेज असू शकते. कारण रासायनिक अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या मूठभर संस्था आहेत. त्यातही फक्त  रासायनिक अभियांत्रिकी संबंधित कंपन्यांचा आम्ही विचार करतो. केवळ भारत पेट्रोलियमच नव्हे तर इतरही नावाजलेल्या कंपन्यांची उत्कृष्ट पॅकेजेस विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत.

डॉ. राजू मानकर, संचालक, एलआयटी