X
X

‘ऑर्केस्ट्रा’बार वर पोलिसांच्या कृपादृष्टी

शहरातील सर्व  ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्यांची मुदत संपल्यानंतरही ते सर्रासपणे सुरू आहेत.

परवाना नूतनीकरणाविनाच सर्रास सुरू

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले असले तरी अवैध धंदे मात्र सुरू आहे. शहरातील सर्व  ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्यांची मुदत संपल्यानंतरही ते सर्रासपणे सुरू आहेत. शिवाय ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली ‘डान्सबार’चा गोरखधंदा चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सर्व अवैध डान्सबारवर स्थानिक पोलिसांची कृपादृष्टी असल्याचे सांगण्यात येते.

अवैध धंदे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच गुन्हेगारांचे फावते. हे सर्व पोलिसांना माहीत आहे. त्यानंतरही शहरात मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची बाब निदर्शनास येत असून यात प्रामुख्याने अवैध दारू विक्री आणि अवैध डान्सबारचा समावेश आहे. हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत मोंढा येथे आदित्य बार, हुडकेश्वरमध्ये ग्रीन बार, एसीई (एस) पब, कामठी अंतर्गत वेलकम बार, मोमिनपुरा मच्छीबाजार परिसरातील मदिरा भवन, पायल बार, सरजा बार, कोतवाली परिसरातील संग्राम बार यांना सुगम संगीताचे परवाने असून त्यांची मुदत केव्हाच संपली आहे. त्यांनी परवाने नूतनीकरणासाठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला. मात्र, पोलिसांनी अद्याप एकही ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्याचे नूतनीकरण केले नाही. त्यानंतरही त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा सुरू असल्याची बाब वेलकम बार, पायल बार, मदिरा भवन आणि संग्राम बारमधील कारवाईवरून स्पष्ट झाले. कारवाई झाल्यानंतरही बार संचालक पुन्हा त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा चालवत असल्याची माहिती आहे. या बारमध्ये सुगम संगीतच्या नावाखाली गाणे गाण्याकरिता मुलींना ठेवण्यात येते. मात्र, त्या मुली गाणे गाण्याऐवजी नाचून ग्राहकांना रिझवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ग्राहकांचा ओढा वाढतो व बार मालकांना अधिक पैसा मिळतो.

तारांकित हॉटेल्सवर कारवाई केव्हा?

बारशिवाय शहरातील तारांकित हॉटेल्समधील ऑर्केस्ट्रा बार परवान्यांची मुदत संपली असून नूतनीकरण झाले नाही. त्यानंतरही पंचतारांकित हॉटेल्समध्ये ऑर्केस्ट्रा सर्रासपणे सुरू आहे. इतर बारवर कारवाई होत असताना तारांकित हॉटेल्सवर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही, हे विशेष.

कारवाई करू

सुगम संगीतचा परवाना घेऊन अवैध डान्सबार चालवण्यात येत असतील, तर ही गंभीर बाब आहे. अशा बारमध्ये कारवाई करून संबंधितांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

 डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त.

22
Just Now!
X