नागपूर : अनैतिक संबंधातून माजी सरंपचाच्या मुलाचा काठीने वार करून निर्घृण खून केला. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडी परिसरात घडली. नरेंद्र कृष्णाजी हरिणखेडे (३५) असे मृताचे नाव आहे. रूपसिंग सोळंकी, त्याचा साथीदार दिनेश कुवरसिंग मौर्य आणि इतरांनी नरेंद्रची हत्या केली. पोलिसांनी दिनेशसह इतर दोघांना अटक केली आहे. तर रूपसिंग हा पत्नीसह फरार आहे.

नरेंद्र याचे वडील माजी सरपंच तर त्याची पत्नी माजी उपसरपंच आहे. तरोडी भागात त्यांची शेती असून त्या ठिकाणी डेअरी फार्म आहे. तेथे रूपसिंग सोळंकी हा काम करीत होता. तो पत्नीसह परिसरातच राहायचा. नरेंद्रचे रूपसिंगच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. गेल्या दहा दिवसांपासून नरेंद्र हा दररोज रूपसिंग याच्या घरी जात होता. रविवारीही नरेंद्र हा शेतीवर जाण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी गेला. मात्र, परतला नाही. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो न साडपल्याने पोलिसांत तक्रार दिली. सोमवारी सायंकाळी तरोडीतील नाल्याजवळील सिमेंटच्या पाइपमधून दुर्गंध येत होती. एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम आदींसह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मृताची ओळख पटली. पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान रूपसिंग याने नरेंद्र यांची हत्या केल्याचे समोर आले. सखोल चौकशी के ली असता रूपसिंग याच्या पत्नीसोबत नरेंद्र यांचे अनैतिक संबंध होते. ही बाब रूपसिंग याला कळली.

रविवारी त्याने काठीने वार करून व गळा दाबून नरेंद्र यांची हत्या केली. दिनेश व इतरांच्या मदतीने मृतदेह सिमेंटच्या पाईपमध्ये लपवला होता. त्यानंतर तो पत्नीला घेऊन पसार झाला. पोलीस रूपसिंगचा शोध घेत आहेत. नरेंद्र याला एक अकरा वर्षांचा मुलगा व आठ वर्षांची मुलगी आहे.