हिंगणा एमआयडीसी, इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्स परिसरात वायू प्रदूषण

उपराजधानीच्या विकासाच्या वेगासोबतच येथील वायुप्रदूषणात देखील तेवढय़ाच गतीने वाढ होत आहे. येत्या काळात ते आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील हिंगणा मार्गावरील एमआयडीसी परिसरात वायुप्रदूषणाच्या सर्व मात्रा ओलांडल्या गेल्या आहेत, तर उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सचा परिसरसुद्धा तेवढाच प्रदूषित आहे. अशावेळी नागपूरकर या वायुप्रदूषणाला कसे सामोरे जाणार, हा एक मोठा प्रश्न आहे.

औद्योगिक वसाहत असल्याने  हिंगणा एमआयडीसी परिसर सुरुवातीपासूनच प्रदूषित म्हणून ओळखला जातो. उद्योगांमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरातील जलस्रोत देखील दूषित झाले आहेत. मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांची कामे हिंगणा एमआयडीसी परिसरात देखील सुरू असल्याने प्रदूषणात आणखी भर पडली आहे. या परिसरात ‘सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर’(एसपीएम) निर्धारित मानकापेक्षा अधिक आहे. या एसपीएमने मानकांची पातळी ओलांडली तर त्याचा थेट परिणाम आतडय़ांवर होतो. तसेच लहान मुले आणि वृद्धांसाठी ते धोकादायक आहे. ‘रिस्पायरेबल सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर’ १०० मायक्रोग्रॅम प्रती घनमीटरच्या आत असेल तर हवा शुद्ध मानली जाते. मात्र, हिंगणा एमआयडीसी परिसरात ती सरासरी ११३.८६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे, तर ‘सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर’ सरासरी १३६.१४ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर आहे.

उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सच्या परिसरातही ‘रिस्पायरेबल सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर’ धोक्याच्या पातळीजवळ पोहोचले आहे.

इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सचा परिसर तसा प्रदूषणाचा नाही. मात्र, मेट्रोचे काम याठिकाणी  सुरू आहे. त्यामुळे तेथील वायुप्रदूषण हे तात्पुरत्या स्वरूपातील असू शकते. मेपर्यंत ते आणखी वाढू शकते. मात्र, एकदा पाऊस पडला की याठिकाणच्या वायुप्रदूषणात नक्कीच फरक पडलेला दिसून येईल. हिंगणा एमआयडीसीचा परिसर मात्र नक्कीच प्रदूषित आहे. उद्योग यायलाच हवे, पण पर्यावरणाचे निकष उद्योगांनी पाळणे आवश्यक आहे. उद्योगांमधील धूर सोडणाऱ्या चिमण्यांची पडताळणी होत नाही. अशावेळी हे घटक वायुप्रदूषणाच्या वाढीस कारणीभूत ठरतात. हिंगणा एमआयडीसीत नेमका हाच प्रकार घडून येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळच्यावेळी प्रदूषणाच्या चाचण्या करायला पाहिजे.