१६ ते १८ वयोगटातील मुलांचे प्रमाण चिंताजनक; पालकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज

उन्हाळी सुटय़ा संपल्या असून शाळा सुरू होण्याची घंटा वाजली आहे. दहावी व बारावीचे काही निकाल लागले असून काही निकाल लागत आहेत. मात्र, मुले शाळेत जात असताना त्यांच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नसून पालकांनी त्यांच्यावर नजर ठेवणे गरजेचे झाले आहे. याचे कारण, बाल गुन्हेगारीचे प्रमाण वेगाने वाढत आहे.

वर्तमान धकाधकीच्या जीवनात आईवडील दोघेही कमावण्यासाठी घराबाहेर पडतात. मुले शाळेत गेली आहेत, या भावनेतून पालकही निर्धास्त असतात. मात्र, शाळेच्या नावाने घराबाहेर पडल्यानंतर ते शाळेत पोहोचतात की नाही, याची खात्री केली जात नाही. शाळा बुडवून मुले वाममार्गाला लागत असल्याचीअनेक उदाहरणे समोर येत असून पोलीस विभागाच्या २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार बाल गुन्हेगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची बाब समोर येत आहे.

सन २०१६ मध्ये राज्यात अल्पवयीन मुलांकडून सहा हजार २३९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले. त्यात १३० खून, २११ खुनाचे प्रयत्न, २११ सदोष मनुष्यवध आणि २५८ बलात्कारांच्या घटनांचा समावेश आहे. त्याशिवाय १ हजार ६७३ चोरीची प्रकरणे, २८१ लुटीच्या घटना, ३१४ प्रकरणात मारहाण करून गंभीर दुखापत करणे आणि ४१९ घटना विनयभंगाच्या नोंद आहेत. २०१५ मध्ये अल्पवयीन मुलांकडून ५ हजार ४८२ गंभीर गुन्हे घडले होते. २०१६ मध्ये त्यात ७५७ ने वाढ नोंदवण्यात आली आहे.

गंभीर व विशेष कायद्यांतर्गत २०१६ मध्ये एकूण ७ हजार ७१२ मुलामुलींविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यापैकी १२ वर्षांखालील १२३, १२ ते १६ वर्षांदरम्यानची १ हजार ९०९ आणि १६ ते १८ वष्रे वयोगटातील सर्वाधिक ५ हजार ६८० मुलांचा समावेश आहे. यावरून १० वी ते १२ वर्गात शिक्षण घेत असताना मुलांचे पाऊल वाकडे पडण्याची शक्यता असून पालकांनी त्यांच्यावर नजर ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मुलींचा सहभाग धक्कादायक

गुन्हेगारीतील अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक आहे. मात्र, त्यात केवळ मुलेच आरोपी आहेत, असे नाही. तर अल्पवयीन गुन्हेगारींमध्ये मुलींचाही सहभाग समोर येत आहे. २०१६ मध्ये कारवाई करण्यात आलेल्या ७ हजार ७१२ अल्पवयीनांमध्ये २१५ मुलीही आहेत, हे विशेष. आज अल्पवयीन गुन्हेगारीतील मुलींचे प्रमाण केवळ २.७९ टक्के इतके आहे. मात्र, भविष्यात हे प्रमाण वाढू नये, यादृष्टीनेही पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.