प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार

जमिनीवरून धावणाऱ्या मार्गासाठी मेट्रो रेल्वेची संपूर्ण तयारी झाली आहे. नवीन वर्षांत नागपूरकरांना मेट्रोतून प्रवासाची संधी मिळेल. दरम्यान, वर्धामार्गावरील मेट्रोचे स्थानक मुंबईतील ब्रिटिशकालीन बांद्रा स्थानकाप्रमाणे विकसित करण्यात येत असून ते प्रवासी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

स्थानक उभारणीसाठी कुशल कामगारांना बोलावण्यात आले असून त्यांच्याहातून कोरीव काम केले जात आहे. स्थानकासाठी ग्रेनाईट, ज्युट, सिरॅमिकच्या सहाय्याने भित्तिचित्रे, शिल्प, धातू, पेंटिग्ज तयार केले जात आहे. मुंबईतील बांद्रा येथील रेल्वेस्थानक ब्रिटिशकालीन स्थानक असून त्याच धर्तीवर मेट्रोचे खापरी स्टेशन विकसित केले जात आहे. नाागपूर-वर्धा महामागावर हे स्थानक असल्याने या भागातील मिहान आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो रेल्वे सोयीची ठरणार आहे.

सप्टेंबर महिन्यात मेट्रोची यशस्वी चाचणी झाल्यानंतर आरडीएसओने या मार्गावर मेट्रोला प्रवासी वाहतुकीची हिरवी झेंडी दाखवली आहे. त्यामुळे लवकरच एअरपोर्ट ते खापरी मार्गावर मेट्रो धावताना दिसेल.

गेल्यावर्षी १२ ऑगस्टला स्थानकाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. येत्या काही दिवसात त्याचे बांधकाम पूर्ण होणार आहे. येथे प्रवाशांसाठी माहिती केंद्राची सोय असेल. दिव्यांग आणि लहान मुलांकिरता विशेष लिफ्ट, स्वतंत्र तिकीट घर, स्वच्छता गृह आदी सोयी तेथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच नेत्रहीन प्रवाशांसाठी विशेष सुविधा स्थानकावर दिल्या जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, मेट्रो स्थानकावर प्रवाशांना विनातिकीट प्रवेश करता येणार नाही. फलाटावर जाण्यापूर्वी स्वंयचलित प्रवेशद्वारातून प्रवाशांना जावे लागेल. तिकीट दाखवल्यावर हे द्वार स्वंयचलित पद्धतीने उघडणार आहे.