|| देवेंद्र गावंडे

‘‘आम्ही तिच्या दु:खात सहभागी आहोत, हा मृत्यू वेदना देणारा आहे. आरोपीला फासावर लटकवल्याशिवाय सोडणार नाही. त्यासाठी नवा कायदा करू. पीडितेच्या कुटुंबातील एकाला नोकरी देऊ, संपूर्ण खटला जलदगतीने चालवू. या घटनेबद्दल अमूकाने संताप व्यक्त केला, तमूकाने खेद व्यक्त केला’’ हिंगणघाट पीडितेचा मृत्यू जेवढा हादरा देणारा आहे तेवढय़ाच या प्रतिक्रिया खिन्न करणाऱ्या आहेत. आपल्याकडे अशा घटना घडल्या की काय बोलायचे हे ठरून गेले आहे. त्याचीच री सारे ओढत असतात. मात्र यापैकी कुणीही घटनेमागील कारणाच्या मुळाशी जात नाही. तसे जावे असे कुणाला वाटत नाही. सारे कसे वरवरचे. अशा घटनांचे मूळ आपणच आजवर जोपासलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीत दडले आहे. जोवर तिला बदलण्याची कृती घडणार नाही तोवर असे कठीण प्रसंग घडतच राहणार याची जाणीव सर्वाना आहे. वास्तव खरे तर हे आहे व त्यापासून समाज कायम पाठ फिरवत आला, हे दु:ख आहे.

हिंगणघाटच्या प्रकरणात एका देखण्या तरुणीचा नकार तरुणाला सहन झाला नाही व हे जळीत कांड घडले. हाच नकार तरुणाने दिला असता तर तरुणीने त्याला थेट पेटवण्याची कृती केली असती का? येथेच या पुरुषी संस्कृतीची बीजे दडली आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकात समाजाने भलेही प्रगती केली असेल पण तो सभ्य व सुसंस्कृत झाला नाही. ज्या समाजात स्त्रियांना बरोबरीची वागणूक मिळत नाही, त्यांचा नकार ऐकून घेतला जात नाही तो समाज सभ्य कसा समजायचा? स्त्रियांविषयाच्या दुय्यमत्वाची भावना समाजाच्या सर्वच घटकात अगदी खोलवर दडली आहे. कुणीही त्याला अपवाद नाही. वेळ आली की बहुसंख्य अगदी तसेच वागतात. त्यामुळे वरच्या प्रतिक्रिया अनेकदा ढोंगी वाटू लागतात. हिंगणघाटच्या घटनेचा तपास करणारा एक अधिकारी म्हणाला, ‘‘प्रेमप्रकरणाचा कटू शेवट झाल्यावर मुलीचे लग्न जुळले व ते तुटले. तो तोडल्याचा संशय त्या मुलावर व्यक्त केला गेला. मग साऱ्यांनी मिळून मुलाला मारहाण केली, त्यातून तो चिडला व हे अग्निकांड घडले.’’ अधिकारी सर्व दृष्टिकोनातून तपास करतात. त्यामुळे वरवर बघितले तर या कथनात कुणालाच काही वावगे वाटणार नाही. पण अधिक खोलात जाऊन ते तपासल्यावर त्या मुलीलाच दोषी ठरवण्याची वृत्ती दिसते. ती सर्वत्र आहे. तरीही अशा घटना घडू नये यासाठी कडक पावले उचलू असे सारेच म्हणतात.

या प्रकरणातील आरोपीचा एक नातेवाईक म्हणाला, ‘‘हा मुलगा लहाणपणापासूनच हट्टी आहे. जे हवे ते मिळवतोच. नाही मिळाले तर कोणत्याही थराला जातो.’’ ही प्रतिक्रिया सुद्धा तेच दर्शवते. त्यामुळेच पुरुषी अहंकारातून येणाऱ्या संतापाला नेहमी स्त्रियांना बळी पडावे लागते. आरोपीच्या कुटुंबाने त्याचा हा हट्टीपणा जसा जोपासला तसा घरातील मुलीचा जोपासला असता का? आपल्या समाजव्यवस्थेत स्त्री-पुरुष समानतेचे पर्व सुरू होऊन आता पाच दशकांपेक्षा जास्त काळ लोटला. अनेक आंदोलने झाली. त्यातून आत्मनिर्भर झालेली स्त्री प्रगत झाली असा  निष्कर्ष काढला गेला. प्रत्यक्षात घराघरातून घडणारे भेदभावाचे दर्शन थांबले नाही. आजही लग्नात मुलीने डावीकडेच बसावे, मुलीचे शिक्षण मुलापेक्षा कमी असावे. मुलाच्या तुलनेत मुलीची उंची कमी असावी असे अलिखित नियम सर्रास पाळले जातात. त्यात बदल कुणी व केव्हा करायचे? अगदी मुलेमुली लहान असतानापासून घरात बरेच भेदभाव पाळले जातात. पुरुषांनी आधी जेवायचे, स्त्रियांनी नंतर. मुलीला भातुकलीचीच खेळणी दिली जातात तर मुलांच्या हातात शूरता दर्शवणारी. सौंदर्य म्हणजे स्त्री तर वीरता म्हणजे पुरुष असेच संस्कार लहानपणापासून केले जातात. सगळे उपवास मुलींना करायला सांगितले जातात व ते पुरुषांशी संबंधित असतात. एखाद्या पुरुषाने स्त्रीसाठी उपास करावा असे आपले संस्कार कधीच का सांगत नाहीत? र.धो. कव्र्यानी स्त्रियांच्या शरीरसुखाचे स्वातंत्र्य व मातृत्वाच्या अधिकाराचा उल्लेख करून आता दशके लोटली. आज किती स्त्रियांना हे स्वातंत्र्य व अधिकार उपभोगता येतात व किती पुरुषांची ती देण्याची तयारी आहे? तरीही आज समाजातील अनेकजण आम्ही स्त्री-पुरुष समानता पाळतो, भेदभाव करत नाहीत असे छातीठोकपणे सांगतात. प्रत्यक्षात वेळ आली की यापैकी अनेकांचे पितळ उघडे पडत असते.

समानता देणे व मानणे यात मोठा फरक आहे हे विसविशीत झालेल्या समाजस्वाथ्यामुळे अनेकांना कळतच नाही. बाळाला दूध पाजणे ही जर स्त्रीची जबाबदारी असेल तर त्याचे डायपर बदलणे ही पुरुषांची जबाबदारी का असू नये, असे प्रश्न शिक्षितांना सुद्धा पडत नाही. हेच शिक्षित अशा घटना घडल्या की हळहळ व्यक्त करण्यात समोर असतात. हा ढोंगीपणा जोवर थांबणार नाही तोवर या घटना कमी होणार नाही. तरुण मुले अशी टोकाची पावले का उचलतात त्याचे उत्तर असे घराघरात दडले आहे. शिक्षण घेतले, भौतिक प्रगती साध्य केली म्हणजे प्रत्येकजण सभ्य व सुसंस्कृत झाला हे मानणे चुकीचे आहे. प्रत्येक घरात होणारे असे संस्कारच मुलांच्या पुरुषी अहंकाराला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गोंजारत राहतात. हे गोंजारणे किती घातक असते हे हिंगणघाटसारख्या घटनेवरुन कळते. मोठी घटना घडली की सारेच हळहळतात, पण सुधारणेचे पाऊल आपल्या घरात उचलू असे कुणालाच वाटत नाही.

आज खरी गरज आहे ती पुरुषी मानसिकता बदलण्याची. त्याच्यातील अहंकाराची वृत्ती बाजूला काढून समानता रुजवण्याची. त्यादृष्टीने कुठेही प्रयत्न होताना दिसत नाही. महिलांच्या कल्याणासाठी सरकार व संस्था अनेक कार्यक्रम घेत असतात. लिंगभावसमानता हा त्यातला एक प्रमुख कार्यक्रम. बहुसंख्य ठिकाणी बघितले तर त्यात महिलांचीच हजेरी असते. खरे तर पुरुषांमध्ये ही समानता रुजवण्याची गरज आहे. मात्र तसा विचारही कुणी करत नाही. समानतेच्या गप्पा करून अनेक वर्षे लोटली तरी पुरुष व स्त्रियांना दर्शवणारी साधी प्रतीके आपण बदलवू शकलो नाही. आज कुठेही गेले तरी स्त्रियांना अबला व पुरुषांना सबळ दाखवणारी प्रतीके आपल्याला दिसतात. स्त्रियांना शिक्षण मिळाले, त्यांच्या अधिकाराची जाणीव त्यांना झाली पण पुरुषांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जोवर बदलणार नाही तोवर असे बळी जातच राहणार. असे काही घडले की ‘आम्हाला शरम वाटते, आम्हाला माफ कर’ अशी लाचारीवजा भाषा करुन केवळ समाजाचे लक्ष वेधता येते. प्रश्न मात्र सुटत नाहीत. समाजसुधारणेच्या गप्पा करणे सोपे आहे, पण बदल घडवणे कठीण. तसे प्रयत्न जोवर होणार नाहीत तोवर हिंगणघाटची पुनरावृत्ती होतच राहील. केवळ नाव व स्थळे तेवढी बदलतील.

devendra.gawande@expressindia.com