देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com

मतभिन्नता कायम ठेवत एकमेकांशी संवाद साधत सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे सुदृढ समाजस्वास्थ्याचे लक्षण ठरते. लोकशाहीत हेच अपेक्षित सुद्धा असते. तसे न करता समाजस्वास्थ्य बिघडवण्याचे काम एखाद्या नवख्याकडून घडले तर ते एकदाचे समजून घेता येईल, पण ज्यांच्याकडे समाज आदराने बघतो त्यांनीच सौहार्दाला नख लावण्याचे काम केले तर अपेक्षेने बघायचे तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण झाला आहे वि.सा. संघ व ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांच्यात उद्भवलेल्या वादातून. शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या साहित्य संघात उजवे, डावे, समाजवादी अशांचा राबता असला तरी त्याचा उजवीकडे झुकणारा लंबक कुणापासून लपून राहिलेला नाही. तरीही या संस्थेने विदर्भाच्या साहित्यक्षेत्रात दिलेले योगदान नि:संशय मोठे आहे. ही बाब विरोधकही मान्य करतात. हा तर उजव्यांचा गोतावळा अशी टीका करणे सोपे; पण शंभर वर्षे संस्था चालवून दाखवणे तेवढेच कठीण. या संस्थेच्या विरोधकांना ते कधीच जमले नाही हे वास्तव. दुसरीकडे दलित साहित्य क्षेत्रात यशवंत मनोहरांचे नाव मोठे. आदराने घेतले जाणारे. कवितेच्या क्षेत्रातील त्यांची मुशाफिरी साऱ्यांनाच अचंबित करणारी. या दोघात जीवनव्रती पुरस्कारावरून निर्माण झालेला वाद सौहार्दाला तडे देणारा आहेच, शिवाय सध्याच्या कलुषित वातावरणाला आणखी बळ देणारा आहे.

मुळात विद्येची देवता समजली जाणारी शारदा ही एक प्रतीक आहे. ती हाडामांसाची व्यक्ती असल्याचा कोणताही पुरावा नाही. तरीही एखादी संस्था शंभर वर्षांपासून याच प्रतीकाची पूजा करत असेल, त्याचा समावेश संस्थेच्या बोधचिन्हात करत असेल तर त्यांना प्रतिगामी ठरवण्याचा अधिकार इतरांना जरूर आहे. हे पूर्णपणे ठाऊक असलेल्या मनोहरांनी मग विचारणा झाली तेव्हाच पुरस्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका का घेतली नाही? गेली अनेक दशके शहरात वास्तव्य करून असणाऱ्या मनोहरांना संस्थेचे बोधचिन्ह ठाऊक नाही यावर कोण कसा विश्वास ठेवेल? त्यांची इहवादाची व धर्म मानत नसल्याची भूमिका एकदम मान्य पण ती निवडक वेळीच उफाळून का येते? त्यांच्या सुविद्य पत्नी जिथे अध्यापन करायच्या तिथेही एका मातेच्या प्रतिमेचे पूजन व्हायचे. त्या संस्थेच्या संचालक मंडळात मनोहर होते. तेव्हा त्यांनी आक्षेप घेतल्याचे स्मरत नाही. कुटुंबावर संकट ओढवले की सरस्वती पूजकांना शरण जायचे आणि सन्मानाच्या वेळी निष्ठेचा उदोउदो करायचा, याला दुटप्पीपणा नाही तर काय म्हणायचे? इहवाद ही जीवननिष्ठा असेल तर व्यक्तिगत असो वा सार्वजनिक, दोन्ही पातळ्यावर त्याचे पालन व्हायलाच हवे. आधी पुरस्कारासाठी समंती द्यायची, त्यानिमित्ताने सत्कार स्वीकारायचे, त्यात संघ व मनोहर म्हैसाळकरांचे कौतुक करायचे आणि शेवटच्या क्षणी तो नाकारायचा. याला काय अर्थ आहे?

संस्थेचे ठळकपणे दिसणारे उजवेपण मनोहरांना ठाऊक नव्हते अशातलाही भाग नाही. मग साऱ्या गोष्टींची व अटींची खातरजमा करून त्यांनी आधीच निर्णय घेतला असता तर त्यांची निष्ठा अधिक उठून दिसली असती. संघाच्या सापळ्यात आपण अडकलो याची जाणीव त्यांच्यासारख्या ज्येष्ठांना वेळेवर होणे हे अनाकलनीय आहे. त्यामुळे त्यांनी ही कृती संघाला धोबीपछाड देण्यासाठी ठरवून केली या शंकेला आपसूकच बळ मिळते. खरे तर मनोहरांनी संघाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांच्या प्रतिगामी भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवला असता तर त्यांचे वेगळेपण उठून दिसले असते. संस्थेने त्यांच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली नव्हती. मतभिन्नता कायम ठेवत साधलेला संवाद याला म्हणतात. सांप्रतकाळी समोरचे वाईट वागत आहेत म्हणून आपणही तसेच वागायचे यात कसली आली प्रगल्भता? लोकशाहीने मत व्यक्त करण्याचा अधिकार सर्वाना दिला आहे. पुरस्कार देतो पण बोलायचे नाही अशी सक्ती मनोहरांवर संघाने केली नव्हती. त्याचा फायदा त्यांना घेता आला असता. या साऱ्या प्रकरणात साहित्य संघ सुद्धा तेवढाच दोषी ठरतो. मनोहरांसारख्या ज्येष्ठांना पुरस्कार देण्याचे निश्चित झाल्यावर त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी इंद्रजीत ओरकेंची निवड करण्यात आली. का? ते दलित साहित्याशी संबंधित आहे म्हणून? समविचारी माणसेच एकमेकांशी सहज संवाद साधू शकतात असे संघाला कसे काय वाटू शकते? हा तर शुद्ध सोवळेपणा झाला? ओरके आपल्या कुवतीप्रमाणे इकडचा निरोप तिकडे पोहचवत राहिले पण त्याला गांभीर्याने घेण्याचे औदार्य संघाने दाखवले नाही. मनोहरांशी इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट संवाद का ठेवला नाही? यात त्यांना कमीपणा वाटत होता की काय? तसे असेल तर संघावर होणारा उजवेपणाचा आरोप अधिक बळकट होतो.

शारदेऐवजी इंदिरा संत, सावित्रीबाई फुले, कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा ठेवा, कारण कार्यक्रम धार्मिक नाही तर साहित्यिक आहे या मनोहरांच्या सूचनेत संघाला नेमके काय वावगे वाटले? पुरस्कृताचा सन्मान म्हणून अशी लवचिकता दाखवण्यात गैर काय? याच संघाने काही वर्षांपूर्वी अमरावतीत दलित साहित्य संमेलन घेतले होते. त्याला विरोध होत असताना सुद्धा जोगेंद्र कवाडे उद्घाटनासाठी हजर झाले. त्यांनीही शारदेची प्रतिमा काढा तरच व्यासपीठावर येतो अशी अट टाकली. संघाने ती तात्काळ मान्य केली अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार शशिकांत ओहळेंनी सांगितली. मग तेव्हा जर संघाने ती कृती केली तर आता करायला काय हरकत होती? संस्था असो वा व्यक्ती, जसेजसे वय वाढत जाते तसतसा त्यांच्यात समंजसपणा येतो असे म्हणतात. येथे तर मनोहरांसोबतच संस्थेने सुद्धा अपरिपक्वपणाचे दर्शन घडवले. एकीकडे आम्ही विरोधी मतांचा आदर करतो, त्यांना सन्मानित करण्यात आम्हाला आनंदच वाटतो असे म्हणायचे व दुसरीकडे वैचारिक परिदृढता कायम ठेवायची. संस्थेचे हसे झाले तरी कडवेपणावर ठाम राहायचे हे चांगले लक्षण कसे समजायचे? साहित्याचा व्यवहार हा अनेक विचारांनी व्याप्त आहे. या साऱ्या विचारांना व्यासपीठावर स्थान देतो अशी मोठेपणाची भूमिका संघ घेत नसेल तर शतकी वाटचालीचा हा पराभव आहे. असे प्रसंग भविष्यात टाळायचे असतील तर आता संघाने पुरस्कार जाहीर करण्याआधी संस्थेच्या अटीचा कागद त्या व्यक्तीकडे पाठवावा व मगच पुढची पावले उचलावी. आम्ही प्रतिगामी नाही, पुरोगामी चळवळीचे आम्हाला वावडे नाही असे एकीकडे म्हणायचे व दुसरीकडे प्रतीकांच्या सन्मानासाठी हाडामांसाच्या व्यक्तीला डिवचायचे अशा ‘संघीय’ खेळी आता लोक ओळखू लागले आहेत. जग आधुनिक होत चालले आहे. साहित्यातले प्रवाहही काळाप्रमाणे बदलत आहेत. अशावेळी साहित्य संघाने कूस बदलायला काय हरकत आहे? तसाही हा संघ ‘म्हाताऱ्यांचा क्लब’ झाला आहे. वृद्ध माणसे भूमिकांना चिकटून राहणे सोडत नाही असे म्हणतात. त्यातून हे रामायण घडले असावे असा तर्क काढायला काय हरकत आहे. सध्या समाज गटातटात विभागला गेला आहे. त्याला खतपाणी घालण्याचे काम दोन्ही बाजूकडून जोरात सुरू आहे. अशावेळी ज्यांच्याकडे आदराने बघावे अशा संस्था वा व्यक्तीच एकारलेपणाचा सूर लावत असतील तर समाजस्वास्थ्य आणखी बिघडणारच. दुर्दैवाने त्याची फिकीर यापैकी कुणालाही नाही हे विदर्भाचे दुर्दैव!