13 August 2020

News Flash

महापौरपद आरक्षित की खुल्या गटासाठी?

पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव होते.

(संग्रहित छायाचित्र)

आज सोडत काढणार

विधानसभा निवडणुकीमुळे समोर ढकलण्यात आलेल्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी सोडत उद्या बुधवारी काढली जाणार आहे. पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी महापौरांचे आरक्षण ठरणार आहे. महापौरपद आरक्षित राहणार की खुल्या गटाला राहणार आहे, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव होते. भाजपने या पदासाठी नंदा जिचकार यांना संधी दिली. त्यांचा कार्यकाळ ५ सप्टेंबरला संपला होता. मात्र त्यांनी त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ मिळावी, अशी विनंती केली होती. अशाच प्रकारची विनंती इतर महापौरांनी केल्यावर व विधानसभा निवडणुकांमुळे राज्य सरकारने महापौरांचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढवून दिला होता. तो आता २१ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे उर्वरित कार्यकाळासाठी बुधवारी सोडत काढली जाणार आहे. यावेळी ते कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहते की खुल्या गटासाठी सुटते, याकडे भाजपमधील इच्छुकांचे लक्ष लागले होते.

नागपूर हे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असल्याने येथील महापौरांना अधिक महत्त्व आहे. भाजपमध्ये या पदासाठी अनेकजण इच्छुक असून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुढच्या काळात निवडणुका नसल्याने यावेळी भाजप या पदासाठी निष्ठावान नगरसेवकांची निवड करण्याची शक्यता आहे.

२०१२-२०१६ या पाच वर्षांत पहिले अडीच वर्षे महापौरपद खुल्या गटातील पुरुषांसाठी राखीव होते त्यावेळी अनिल सोले यांना पक्षाने संधी दिली होती. त्यानंतरचे अडीच वर्षे इतर मागासवर्गीय पुरुष गटासाठी राखीव होते. त्यामुळे प्रवीण दटके यांना महापौर होण्याची संधी भाजपने दिली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरात भाजपला अपेक्षित यश आले नाही. पक्षाचे दोन आमदार पराभूत झाले. दोन निसटत्या मतांनी विजयी झाले. सध्या नंदा जिचकार यांच्या रूपात दक्षिण पश्चिम मतदारसंघात तीन वर्षे महापौरपद होते. यावेळी इतर विधानसभा मतदारसंघाचा विचार होण्याची शक्यता आहे. पूर्व नागपूरमधून भाजपला लोकसभेत मोठे मताधिक्य मिळाले होते. विधानसभा निवडणुकीतही येथून भाजपचे कृष्णा खोपडे यांनी जागा राखली. त्यामुळे यावेळी ते महापौरपदासाठी आग्रही राहू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 12:35 am

Web Title: mahapalika mayor nagpur akp 94
Next Stories
1 ‘साहेबराव’ला कृत्रिम पाय बसवण्याचे स्वप्न टप्प्यात!
2 न्युक्लिअर मेडिसिन प्रकल्प तांत्रिक पेचात अडकला!
3 यंदा नागपुरात तयार फराळाची उलाढाल चार कोटींच्या घरात
Just Now!
X