नागपूर : पैशाच्या वादातून दोन मद्यपी भावांमध्ये भांडण झाले. एकाने दुसऱ्याला धक्का दिल्याने डोक्याला दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून लहान भावाला अटक केली.

प्रीतम भजन लोखंडे (३२) रा. पांढराबोडी असे मृताचे तर विजय भजन लोखंडे (२३) असे आरोपीचे नाव आहे. प्रीतम हा मिळेल ते काम करायचा तर विजय हा कार धुवायचा. दोघांनाही दारूचे व्यसन होते.

मद्य प्राशन केल्यानंतर दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला व प्रीतम हा घराबाहेर निघून गेला. तेव्हापासून तो गोकुळपेठ परिसरात पदथावर झोपत होता. सोमवारी विजयने काही पैसे घरी ठेवले होते. दरम्यान, घरातून पैसे गेले. रात्री प्रीतम घरी पोहोचला असता विजयने त्याला पैशासंदर्भात विचारणा केली. ते एकमेकांना शिवीगाळ करायला लागले.

त्यामुळे आई प्रमिला या घराबाहेर गेल्या. विजयने प्रीतमला जोरदार धक्का दिला. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन केले असता हा नैसर्गिक मृत्यू नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी विजयची चौकशी केली. त्याने गुन्हा कबूल केला.  पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.