*  एक लाख गर्भवतींमध्ये १२० मृत्यू

*  नार्ची आणि एनकेपी साळवे मेडिकल सायन्सचा दावा

देश, राज्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्य़ात मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी महिलांमध्ये प्रसूती दरम्यान होणारा अतिरिक्त रक्तस्राव हे प्रमुख कारण असल्याचा दावा स्त्रीरोग तज्ज्ञांची संघटना ‘नार्ची’ आणि एनकेपी साळवे मेडिकल सायन्सने त्यांच्या निरीक्षणाच्या आधारे केला आहे. जिल्ह्य़ात एक लाख गर्भवतींमागे  सुमारे ११५ ते १२० मृत्यू होत असल्याचे दिसून आले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २५ टक्के मातेच्या मृत्यूचे कारण हे प्रसूती पश्चात होणारा रक्तस्राव आहे. विकसित देशांमध्ये हे प्रमाण कमी असले तरी विकसनशील देशामध्ये ते अधिक आहे. अमेरिकेत एक लाख महिलांपैकी ३५ ते ४० महिलांचा मृत्यू प्रसूती दरम्यान होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्राव व इतर कारणांमुळे मृत्यू होतो. भारतात हे प्रमाण १३५ च्या जवळपास आहे. महाराष्ट्राची स्थिती थोडी सुधारल्याने येथे १०६ ते ११० मातांचा मृत्यू होतो. नागपूर जिल्ह्य़ात ही संख्या ११५ ते १२० इतकी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने भारताला माता मृत्यूचे प्रमाण एक लाखामागे  ७०  इतके कमी  करण्याचे लक्ष्य दिले आहे. त्याकरिता केंद्र व राज्य शासनाला मातेच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यानुसार प्रत्येक गर्भवती महिलेला सुरुवातीपासून पोषक अन्न उपलब्ध करणे, महिलाची नियमित वैद्यकीय तपासणी, सुरक्षित प्रसूती यासह इतरही काळजी घेणे आवश्यक आहे.

‘वॉकथॉन’ २९ ला

माता मृत्यू कमी करण्यासाठी व आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘नार्ची’ तर्फे  २९ सप्टेंबरला रामदासपेठ ते झाशी राणी चौक दरम्यान सकाळी सात वाजता ‘वॉकथॉन’ आयोजित केली आहे. त्यात मोठय़ा संख्येने डॉक्टरांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे एनकेपी साळवे मेडिकल सायन्सच्या  प्रा. डॉ. अनुजा भालेराव यांनी सांगितले.

डॉ. थॉमस यांचे तंत्र फायद्याचे

प्रसूतीदरम्यान महिलांमध्ये होणारा अतिरिक्त रक्तस्राव थांबवण्यासाठी डॉ. थॉमस बर्थ यांनी नवीन तंत्र शोधून काढले आहे. त्यानुसार महिलेच्या गर्भाशयाच्या पोकळीत ‘बलून’द्वारे पाणी टाकून ते फुगवले जाते. त्यामुळे रक्तस्राव थांबवता येतो. नागपूर जिल्ह्य़ातही अनेक महिलांना लाभ झाल्याचे नार्चीच्या निरीक्षणात पुढे आले आहे.

– डॉ. क्षमा केदार, अध्यक्ष, नार्ची, नागपूर.