पोलीस निरीक्षकाविरुद्ध महिला कर्मचाऱ्याची तक्रार

 नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचारी महिलेच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची चर्चा शांत होत नाही तोच पोलीस विभागातील एक पोलीस निरीक्षक ‘मी टू’ प्रकरणात अडकला आहे. याबाबत  महिला कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी घेतली असून पोलीस उपायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

या तक्रारीनुसार, एक वर्षांपासून पोलीस निरीक्षक पीडित महिलेचे लैगिंक शोषण करीत होता. आरोपी विवाहित असून त्याला दोन अपत्य आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपीने महिलेला मारहाण केली. ‘माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, तुला जे करायचे ते कर’, अशी धमकी दिली.

त्यामुळे पीडित महिलेने आरोपी सध्या तैनात असलेल्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र येथील पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर दोन दिवसांपूर्वी पीडित महिलेने थेट पोलिस आयुक्त कार्यालय गाठून उपाध्याय यांच्याकडे लिखित तक्रार केली. त्या तक्रारीची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली व उपयुक्तांना चौकशीचे आदेश दिले.