समृद्धी महामार्गामुळे वन्यप्राण्यांचे संचारमार्ग खंडित होऊ नये म्हणून समिती गठित करण्यात आली. मात्र, याच समृद्धी महामार्गाला समांतर मार्गावर खाणकामामुळे वाघांचे संचारमार्ग खंडित होत असताना वनखात्याने त्याची दखल घेतली नाही. एकीकडे समृद्धीपासून वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा प्रयत्न आणि दुसरीकडे खाणकामांमुळे असुरक्षित संचारमार्गावर चुप्पी साधायची, अशी वनखात्याची दुहेरी भूमिका वन्यजीवतज्ज्ञांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

नागपूर-मुंबई हे अंतर कमी वेळात पार करण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार होत आहे. या महामार्गात आतापर्यंत कोटय़वधी झाडांचा बळी गेला आहे. वन्यजीवांची तीच स्थिती होऊ नये म्हणून सुरक्षित उपाययोजनांसाठी समिती गठित करण्यात आली. त्यानुसार वन्यप्राण्यांचे संचारमार्ग सुरक्षित राखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे.

मात्र, त्याचवेळी या मार्गाला समांतर खाणीचे काम सुरू असताना त्यावर वनखात्याने अजूनपर्यंत भूमिका स्पष्ट केलेली नाही. सव्‍‌र्हे नंबर ६७ मध्ये संरक्षित जंगलात कक्ष क्र. १८९ मध्ये आजनगाव येथे खाणीचे काम सुरू आहे. मुरुमसाठी हा मार्ग पोखरला जात आहे. हा मार्ग वन्यप्राण्यांचा आणि विशेषकरून वाघांचा संचारमार्ग आहे. बुटीबोरीत आलेल्या वाघाने याच संचारमार्गाचा वापर केला असण्याची दाट शक्यता आहे. याच परिसरातून समृद्धी महामार्ग जात आहे. हे खाणकाम समृद्धीसाठी नाही. याठिकाणी आधीपासूनच ही खाण आहे.

वाघांच्या संचारमार्गात ती येत असताना वनखात्याने कधी त्यावर आक्षेप घेतला नाही. देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने विदर्भातील वाघांचे संचारमार्ग आखून दिले जात आहेत. त्यानंतर वनखात्याने या संचारमार्गात कुठेही वाघांच्या अधिवासाचा ऱ्हास होऊ नये, याची खबरदारी घेण्याची गरज होती. ही खाण महसूल विभागाच्या हद्दीत आहे, वनखात्याच्या हद्दीत नाही, असे म्हणून वनखात्याने हात झटकले.

मात्र, खाणकाम महसूल विभागाच्या हद्दीत असले तरीही तो वाघांचा संचारमार्ग आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून देणे ही वनखात्याची जबाबदारी आहे.

समृद्धी महामार्गाच्या पाहणीदरम्यान वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनाच या खाणकाम, सव्‍‌र्हे क्रमांक तसेच कक्ष क्रमांकाची देखील माहिती नसल्याचे दिसून आले. एकीकडे समृद्धी महामार्गाचे अधिकारी याविषयी जागरूक असताना, वनखात्याची वाघांच्या संचारमार्गाविषयीची अनभिज्ञता समोर आली. वनखात्याने आतातरी या संचारमार्गाच्या संवर्धनाविषयी भूमिका घ्यावी, अशी मागणी वन्यजीवतज्ज्ञांनी केली आहे.