वन्य प्राण्यांचे बचावकार्य आणखी सुलभ

नागपूर : मानव-वन्यजीव संघर्षांदरम्यान वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदूकीत एकाचवेळी एकच इंजेक्शन भरले जात होते. आता मात्र, एकाचवेळी सहा इंजेक्शन भरता येईल अशी पहिलीच बंदूक राज्यात केवळ नागपुरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात उपलब्ध झाली आहे. अमेरिके हून मागवण्यात आलेल्या या अत्याधुनिक बंदुकीमुळे वन्यप्राण्यांचे बचावकार्य आणखी सुलभ व सोपे होणार आहे.

आधी अशा या बंदुकीत वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी एकाचवेळी एकच इंजेक्शन भरता येत होते. त्यामुळे पहिला निशाणा चुकला तर पुन्हा बंदुकीत इंजेक्शन भरावे लागायचे आणि तोपर्यंत तो वन्यप्राणी नजरेआड व्हायचा. आता ही शक्यता टाळता येणार आहे. विदर्भात मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटना अधिक घडत असतात. अशावेळी ही अत्याधुनिक बंदूक  मदतीला आली आहे.  जॉर्ज कु रियन, रवी पाटीदार आणि या अत्याधुनिक बंदुकीचे तज्ज्ञ नमन दाणी यांनी ही बंदूक आज विधिवत उपवनसंरक्षक(प्रादेशिक) डॉ. प्रभूनाथ शुक्ल तसेच राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्या सुपूर्द के ली. ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या सर्व चमुला त्यांनी ही बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले. भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्र नागपूर वनखात्याने तयार के ले आणि आता सहा इंजेक्शन भरता येणारी वन्यप्राणी बेशुद्धीकरणासाठी वापरली जाणारी ही बंदूक देखील पहिल्यांदा याच केंद्राकडे आली आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षांत ती अधिक उपयुक्त ठरणार आहे.