News Flash

‘फ्लाईंग क्लब’ परवान्याच्या प्रतीक्षेत

विदर्भातील एकमेव वैमानिक अभ्यास प्रशिक्षण केंद्र

विदर्भातील एकमेव वैमानिक अभ्यास प्रशिक्षण केंद्र

विदर्भातील एकमेव फ्लाईंग असलेला नागपूर फ्लाईंग क्लब यंदा परवान्याच्या प्रतीक्षेत असल्याने अजून क्लबतर्फे सरावाला प्रारंभ होऊ शकला नाही. यासंदर्भातील सर्व निरीक्षण आणि औपचारिकता पूर्ण झाल्या असून नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए)कडून परवाना मिळेल, असे अपेक्षा क्लबच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

विदर्भाचा गौरव असलेल्या या क्लबची स्थापना १९४७ मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत विविध कॅटेगिरीमधील सुमारे ५०० वैमानिक तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने १९९० मध्ये हे आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर २००६ मध्ये क्लबचे पुनर्जीवन करण्याचे ठरले. त्यानुसार क्लबला कंपनीचा दर्जा देण्यात आला. २००७ मध्ये कंपनी कायद्यानुसार नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर फ्लाईंग क्लबचे नाव बदलून नागपूर फ्लाईंग प्रायव्हेट लिमिटेड असे झाले. या कंपनीला भारत सरकारचा कंपनीचा दर्जा प्राप्त असून राज्य सरकार ती चालवत आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाकडून हे चालवण्यात येते. क्लबचे संचालक मंडळ असून त्याचे अध्यक्ष विभागीय आयुक्त आहेत. याशिवाय व्यवस्थापन समिती आहे.

क्लबच्या परिसरात ग्राऊंड ट्रेनगसाठी थेअरी कोर्सेस घेतले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या विषयांसाठी निदेशक नियुक्त केले आहेत.

विद्यार्थ्यांची नियमित वेळापत्रकानुसार तसेच अचानक चाचणी घेऊन मूल्यांकन केले जाते. १९६२च्या युद्धानंतर भारत सरकारने देशातील सर्व फ्लाईंग क्लबला प्राथमिक फ्लाईंग प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता दिली होती. त्यामध्ये नागपूर क्लबचा समावेश होता. दिल्ली फ्लाईंग क्लबमध्ये प्राथमिक धडे घेतले. कॅप्टन विजय थेरागावकर यांनी नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये तयारी केली. त्यानंतर त्यांनी या क्षेत्रात बरीच उंची गाठली. हा क्लब अधिक गतीने कार्यरत होणे आवश्यक आहे, असे विंग कमांडर अशोक मोटे (निवृत्त) म्हणाले.

 

अभ्यासक्रम

नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये अनेक अभ्यासक्रम चालवण्यात येत आहेत. त्यात प्रामुख्याने विद्यार्थी वैमानिक परवाना, खासगी वैमानिक परवाना (पीपीएल), वाणिज्यिक वैमानिक परवाना (सीपीएल) हे अभ्यासक्रम आहेत. हा अभ्यासक्रम साधारणत: दोन वर्षांचा असतो.

क्लबचे मुख्य कार्यालय

नागपूर फ्लाईंग क्लब लिमिटेडचे कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालयात आहे. क्लबचे संचालन क्षेत्र डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी हँगर क्रमांक १ आहे. या कंपनीचे संचालक मंडळ असून अध्यक्ष विभागीय आयुक्त असतात.

उद्देश

या क्लबचा मुख्य हेतू विमान उडवण्याची कला आणि विज्ञानाला प्रोत्साहन देणे आहे. तसेच नागरी विमान वाहतूक उद्योगासाठी वैमानिकांना प्रशिक्षण देणे आहे. एअरलाईन्स उद्योगात प्रवेश करू इच्छणाऱ्यांना येथून प्रशिक्षण घेऊन मार्ग सोपा होईल.

पायाभूत सुविधा

क्लबकडे संचालन क्षेत्र सुमारे २२०० चौ.मी. आहे. क्लबकडे तीन सेसना १५२ विमान आणि एक सेसना १७२ (ग्लास कॉकपीट) आहे.

पुष्पक व्हीटी-डीसीई आणि सिल्वाईर व्हीटी-डीसीजे हे दोन विमान प्रात्यक्षिकासाठी आहेत. नागपुरात ३००० मी. लांबीची धावपट्टी असून आणि २४ तास वॉच टॉवर आहे. याशिवाय अमरावती येथे ६००० फुटाची स्वतंत्र धावपट्टी आहे. तसेच मुला-मुलींचे वसतिगृह बांधण्याची योजना आहे.

प्रवेश कसा मिळेल

पीपीएल आणि सीपीएल अभ्यासक्रमांसाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित केली जाते. इतर अभ्यासक्रमासाठी व्यवस्थापकीय संचालकांशी वर्षभरात केव्हाही संपर्क साधला जाऊ शकतो. प्रवेश बारावीतील गणित आणि भौतिकशास्त्र विषयातील गुणांच्या आधारे दिला जातो. यासाठी किमान वय १८ वर्षे असावे लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 1:36 am

Web Title: nagpur flying club waiting for a license
Next Stories
1 ‘गरिबांची सेवा हाच मदर तेरेसांचा संदेश’
2 ‘गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया’ आणि ‘सारस वैभव गोंदियाचे’ माहितीपटाचे प्रकाशन
3 राज्यपालांचे निर्देश, अनुशेषावर चर्चा
Just Now!
X