चौकशीसाठी बोलवूनही अटक नाही, पोलिसांच्या भूमिकेवर संशय

‘डब्बा ट्रेडिंग’ प्रकरणातील फरार आरोपींपैकी काहींनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांना सोडून दिले आहे. हजारो कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात आता आरोपींच्या अटकेची आवश्यकता नाही, अशी बनवाबनवी पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याने डब्बा प्रकरणातील आरोपींना पोलिसांचेच तर अभय नाही ना? असा सवाल उपस्थित करण्या येत आहे.

या छापा कारवाईत डब्बा ट्रेडिंगमध्ये गुंतलेल्या पांढरपेशा गुन्हेगारांचा बुरखा फाटला. यात मोठय़ा प्रमाणात दस्तावेज, संगणक आणि इतर साहित्य जप्त केले गेले. या कारवाईत ८ गुन्हे दाखल करून २१ जणांविरुद्ध कारवाई केली असून दहाजणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रमेश छोटेलाल पात्रे (रा. वैशालीनगर), गोविंद भंवरलाल सारडा (रा. कॅनाल रोड), कुशल किशोर लद्दड (रा. रामदासपेठ), प्रीतेश सुरेशकुमार लखोटिया (रा. २०१, शंकरनगर), अश्वीन मधुकर बोरीकर (रा. दुर्गावतीनगर), विकास लक्ष्मीनारायण कुबडे (रा. पाचपावली), स्वप्नील विजयराव पराते (रा. शिवाजीनगर), विजय चंदुलाल गोकलानी (रा. क्वेटा कॉलनी), निरज ओमप्रकाश अग्रवाल आणि निमिश किरीट मेहता यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. रवी ओमप्रकाश अग्रवाल, दिनेश भंवरलाल सारडा (रा. कॅनाल रोड), विनय श्रीप्रकाश अग्रवाल (रा. एलीमेंटस अपार्टमेंट, सूर्यनगर), अंकित ओमप्रकाश मालू (रा. वाठोडा, नंदनवन), आशीष मुकुंद बजाज (रा. हिवरीनगर), अभिषेक मुकुंद बजाज (रा. हिवरीनगर), कन्हैय्या उर्फ कन्नी रामचंद्र थावराणी आणि सचिन ठाकुरलाल अग्रवाल (रा. सतनामीनगर) आणि वीणा घनश्याम सारडा (रा. शिवाजीनगर) हे आरोपी फरार आहे.

यापैकी काही आरोपींनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावण्यात आली. परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. शिवाय पोलीस त्यांना सातत्याने फरार सांगत आहेत. यामुळे पोलिसांसमोर हजर होऊनही दस्तावेजावर आपण फरारी आरोपी असल्याचे दाखवण्यात येत असल्याने आरोपींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यावरून फरारी असलेल्या आरोपींना पोलिसांकडून संरक्षण प्राप्त होत असल्याची टीकाही होऊ लागली आहे.

दहा हजारांवर कोटींचा गैरव्यवहार

आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांवरून डब्बा ट्रेडिंगमध्ये दहा हजारांवर कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. शिवाय डब्बा ट्रेडिंगमध्ये नागपूर हे केंद्रस्थानी आहे. एवढय़ा मोठय़ा गैरव्यवहारांच्या प्रकरणाच्या तपासासाठी फरार आरोपींच्या अटकेची आवश्यकता न भासणे, हे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. पहिल्या दिवशी पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली. त्यानंतर एकाही आरोपीला अटक न करण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण करण्यात येत आहे.

‘तेव्हा पुरेसे पुरावे नव्हते’

तपासाच्या सुरुवातीला आपल्याकडे पुरेसे पुरावे नव्हते. त्यामुळे त्यांना बोलवून सोडण्यात आले. आर्थिक गुन्ह्य़ांमध्ये पुराव्यांशिवाय अटक केली तर न्यायालयातून त्यांना ताबडतोब जामीन मिळाला असता. त्यानंतर तपास पुढे सरकत गेला. जप्त केलेल्या संगणकांचे हार्डडिस्क आणि इतर बाबी तपासल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुरावे सापडले. त्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली. परंतु ते आता फरारी आहेत. हीच प्रक्रिया कायदेशीर असून यात काहीही चुकीचे झालेले नाही.

– रंजनकुमार शर्मा, प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त