महापालिका आयुक्तांचा नवा आदेश

नागपूर : शहरात काही केल्या  करोनाबाधितांची संख्या  नियंत्रणात येत नसल्याने महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नवीन आदेश दिले आहेत. या नवीन आदेशानुसार उद्या बुधवारपासून २१ मार्चपर्यंत किराणा दुकाने, भाजीबाजार, मटण- चिकन व मासोळी बाजारातील दुकाने दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.

सकाळी किती वाजता दुकाने उघडावी याबाबत कुठेही स्पष्टता नसली तरी दुपारी १ वाजता मात्र ती ही सर्व दुकाने बंद करावी लागणार आहेत.  टाळेबंदीत किराणा दुकान, भाजी बाजार, फळ विक्री, मटण बाजाराला पूर्वी वेळेची मर्यादा नव्हती. मात्र  करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता त्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

याशिवाय जे रुग्ण नियमांचे पालन न करता बाहेर फिरत असतात त्यांच्यावर कारवाईचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी आशीनगर झोनमधील महेंद्र नगरात राहणारे नागरिक करोनाबाधित असताना बाहेर फिरत होते. उपद्रवी पथकाकडे या संदर्भात तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर  पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आणि त्यांना पाचपावलीतील विलगीकरणात पाठवण्यात आले.

१२ प्रतिष्ठानांवर कारवाई

१२ प्रतिष्ठानांवर उपद्रवी पथकाकडून कारवाई करीत १ लाख ६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पथकाने काटोल मार्गावरील गती के.डब्ल्यू. ई. एक्सप्रेस लिमिटेडला २५ हजाराचा दंड ठोठावला. याशिवाय अजमेरा टायर्स, प्रा. लिमि. धवन प्लाझा, गणेश किराणा स्टोअर्स, महालक्ष्मी बेकरी, मोर्या ट्रेडिंग कंपनी, हल्दीराम  फॅक्टरी, आयर्न फॅक्टरी, इंदोर नमकीन रेस्टॉरंट कमाल चौक, अलंकार रिअल इस्टेट कामठी रोड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय पथकांनी ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.