शहरात सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी या उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे पर्यावरण आणि प्रदूषणासंदर्भात महापालिकेच्यावतीने सार्वजनिक गणेश मंडळात फलक लावण्यात आले असले तरी अनेक गणेश मंडळात लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि पोलिसांची उपस्थिती असताना उत्सवाच्या उत्साहाला कोणतीही मर्यादा राहिली नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे आणि त्यासाठी कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाही.

ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या र्निबधाचे पालन करावे, असे आदेश देण्यात आल्यानंतरही त्याचे उल्लंघन होत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, राजकीय पक्षांचे मेळावे, विवाह सोहळा अशा वेगवेगळ्या उपक्रमांत ध्वनिक्षेपक, डी.जे. साऊंड सिस्टीम, ढोल व ताशांचा गजर, वाद्ये व फटाक्यांची आतषबाजी यामुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, शहरात गणेशोत्सवाच्या दरम्यान मोठय़ा आवाजात डीजेवर गाणी वाजविली जात असताना त्याकडे लोकप्रतिनिधी आणि पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे समोर आले आहे.

रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठय़ा आवाजात डीजे लावून त्यावर सैराटमधील झिंग झिंग झिंगाट पासून ते शांताबाई..पर्यंत अशी विविध गाणी वाजवली जात असता त्यावर उत्साही युवकांचे नृत्याचे हिडीस प्रदर्शन बघायला मिळाले. नंदनवन, रेशीमबाग, त्रिमूर्तीनगर, महाल, गांधीबाग, वर्धमाननगर, मानेवाडा यासह शहरातील विविध भागात आणि वस्त्यांमध्ये मोठय़ा आवाजात डीजेवर गाणी वाजवली जात असताना त्यावर युवक-युवती नाचत होती. डीजेवरील आवाजाचा कोणाला त्रास होतो याची दखल सुद्धा गणेश मंडळातील कार्यकर्ते घेत नव्हते. हा सर्व प्रकार शहरातील अनेक भागात विविध राजकीय पक्षातील नेते, पोलिसांच्या उपस्थितीत सुरू असल्याचे चित्र होते. मात्र, या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणावे, याकडे कोणाचे लक्ष नव्हते. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना त्या ठिकाणी १०० ते २०० डेसिबल्स क्षमतेचे ध्वनिप्रदूषण गणेशोत्सवाच्या काळात होत असल्याचे समोर आले. त्याला रुग्णालये, शाळा आणि धार्मिक स्थळांचा समावेश असणारे शांतता विभागही अपवाद ठरले नाहीत. रामदासपेठ आणि सक्करदरा भागात अनेक रुग्णालये असताना त्या ठिकाणी अशीच परिस्थिती होती. ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची पुरेशी कल्पना नसल्यानेच मंडळाचे आयोजक सहजपणे आवाजाच्या सीमारेषा ओलांडत होते. त्यांना रोखण्यासाठी मात्र कुठलेच प्रयत्न होताना दिसले नाहीत.

या ध्वनिप्रदूषणामुळे कमी ऐकू येणे, बहिरेपणा अशा स्वरूपाचे ठळक दोष या प्रदूषणामुळे दिसून येतात. लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना त्याचा त्रास होतो. या प्रदूषणाचा सर्वात जास्त त्रास आयोजकांनाच होतो. कारण मंडपात, तेच सर्वात जवळ असतात. मात्र, उत्साहात असलेल्या कार्यकर्त्यांना त्याची फिकीरही नसते आणि त्याकडे राजकीय नेते व पोलीसही दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले.

कर्णकर्कश आवाजामुळे बहिरेपणा

ध्वनिप्रदूषणाचा माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होतो. पर्यावरण समतोल बिघडण्यासही ध्वनिप्रदूषण महत्त्वाचे कारण आहे. कर्णकर्कश आवाजामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. शिवाय हृदयरोगही होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. ही जाणीव अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना असताना उत्साहाच्या भरात मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.