|| मंगेश राऊत

आतापर्यंत सात खुनात सहभाग; १९८९ मध्ये केला पहिला खून

नागपूर : सात खुनाचे गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड रणजित सफेलकर राजकीय वरदहस्तामुळेच  आजवर प्रत्येक गुन्ह्यात वाचत आला. राजकारणाचा आधार घेत ‘प्रतिष्ठित’ झाला.  पण, मनीष श्रीवास हत्याकांडाचा छडा लावून पोलिसांनी अखेर त्याचा बुरखा फाडलाच.

सफेलकर याचे वडील अवैध दारू विकायचे. बाल वयापासून त्याने घरात अवैध धंदे आणि त्याच्याशी निगडित लोकांना बघितले होते. वडिलांच्या तालमीतच तो मोठा झाला. अवैध दारूचा व्यवसाय करताना त्याचे लोकांसोबत भांडण झाले. १९८९ ला त्याने पहिल्यांदा भांडण करून मारहाण केली. त्यावेळी त्याच्या वडिलाने त्याला वाचवले. मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांसोबत त्याचा थेट सामना झाला व तेथून सुखरूप बाहेर पडताच कोणत्याही गुन्ह्यातून बाहेर पडता येऊ शकते, असा त्याचा समज झाला. पहिल्या मारहाणीच्या घटनेनंतर दंगल घडवण्याचा दुसरा गुन्हाही त्याने केला. या गुन्ह्यातही त्याच्याविरुद्ध विशेष कारवाई झाली नाही.

त्याच वर्षी त्याने पहिला खून केला. पहिल्या खुनात काही दिवस कारागृहात राहिल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. तेव्हापासून त्याने काही स्थानिक गुंडांना हाताशी धरून कामठी परिसरात दादागिरी  सुरू केली. तीन वर्षात त्याने आपली दहशत निर्माण केली. १९९७ मध्ये त्याने दुसरा खून केला. परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी किंवा विरोधकांकडून जीवास धोका निर्माण झाल्यानंतर तो त्यांचा खून करायचा. खंडणी मागणे, जमीन बळकावणे, लोकांना धमकावणे, कामठीतील अवैध धद्यांवर वर्चस्व निर्माण करणे हे नित्याचेच झाले होते. खून केल्यानंतर काही महिने कारागृहात जायचे व जामिनावर कारागृहाबाहेर येताच पुन्हा खून करायचे, हा जणू सफेलकरचा नित्यक्रमच झाला होता. १९९८, २००२ आणि २००७ मध्ये त्याच्याविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

आतापर्यंत त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत.  २०१२ मध्ये त्याने मनीष श्रीवासचे हत्याकांड घडवून आणल्याचे उघड झाले. त्यानंतरही तो समाजात पांढरपेशा व्यक्ती म्हणून वावरत होता. याला कारण त्याच्यावरील राजकीय वरदहस्त. कामठी परिसरातील आरपीआय व काँग्रेसचा प्रभाव कमी करून आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी एका माजी मंत्र्यांनी रणजित सफेलकरच्या पाठीवर हात ठेवला. आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सफेलकर व त्याच्या टोळीचा वापर केला. प्रसंगी पोलिसांवर दबाव टाकून व कायदा वाकवून  सफेलकरची अनेक पापेही झाकण्याचे काम केले. यातून सफेलकरची हिंमत वाढली. यामुळे एकेकाळी गुंडगिरीतून खून करणारा सफेलकर राजकीय हित साध्य करण्यासाठी दुसऱ्यांकडून खून करवून घेऊ लागला.  एकनाथ निमगडे हत्याकांडातून हे स्पष्ट झाले आहे.

उपाध्यक्ष होण्यासाठीच मनीषचा खून

एका नेत्याच्या आशीर्वादामुळे सफेलकरमध्येही राजकारणाची इच्छा जागृत झाली. २०१२ मध्ये त्याने नगरपरिषदेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. नगरपरिषदेत तेव्हा मुस्लीम व अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाच्या प्रतिनिधींचे प्राबल्य होते. कामठीत नेहमीच मतदारांना प्रभावित करण्यासाठी राजकीय पक्ष गुंडांना हाताशी धरायचे. सफेलकर स्वत:च गुंड होता व टोळीही चालवायचा. त्यामुळे विरोधी गटातील उमेदवारांनी मनीष श्रीवासला जवळ केले होते. ५ फेब्रुवारी २०१२ ला मतदान होते. मनीष आपल्याला ठार मारेल, असे सफेलकरला वाटत होते. त्यापूर्वीच सफेलकर व त्याच्या टोळीने अतिशय योजनाबद्धपणे मनीषचे हत्याकांड घडवून आणले. यानंतर सफेलकर नगरसेवकपदी निवडून आला. त्यानंतर ६ ऑगस्ट २०१४ मध्ये अडीच वर्षांकरिता तो नगरपरिषदेचा उपाध्यक्षही झाला.

धूळफेक करण्यासाठीच श्रीराम सेना

सफेलकर हा एका राजकीय पक्षासोबत जुळला होता. पण, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे टीका होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याने श्रीराम सेना नावाची संघटना स्थापन केली. पण, त्यानंतरही या पक्षाच्या कार्यक्रमात त्याची उपस्थिती व माजी मंत्र्यांसोबत त्याचे संबंध सर्वश्रूत आहेत. आज केवळ सात खुनांमध्ये सहभाग दिसत असला तरी अशा अनेक खुनाच्या घटना आहेत, ज्यात सफेलकरचे नाव जोडले जाते. त्या खुनांचाही छडा गुन्हे शाखा पोलीस लावतील का, असा प्रश्न सफेलकरच्या अटकेनंतर उपस्थित करण्यात येत आहेत.