देवेंद्र फडणवीस यांची माहिती; पंतप्रधानांच्या हस्ते कार्यक्रम

उच्चशिक्षण घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेले लंडनमधील घर महाराष्ट्र सरकारले विकत घेतले आहे. या घराचे १२ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात दिली. या वेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, संशोधन केंद्र आणि ग्रंथालयाचे उद्घाटन आणि हस्तांतरण सोहळ्याचे आयोजन दीक्षाभूमीवर करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, १२ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या ऐतिहासिक घराचे उद्घाटन व्हावे, अशी महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांकडे इच्छा व्यक्त केली. पंतप्रधानांनी ही इच्छा मान्य करून लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यास होकार दर्शविला असल्याचे ते म्हणाले. याशिवाय, धम्मक्रांतीचे स्थळ दीक्षाभूमीला जागतिक पर्यटनस्थळ निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. त्यासाठी दीक्षाभूमीचा विकास आराखडा तयार करून सरकारला सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दीक्षाभूमीवरील स्मारक हे जागतिक आकर्षणाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना यासाठी संपूर्ण परिसराचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी निधी दिला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील इंदू मिल परिसरात होणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकही जागतिक दर्जाचे होणार असल्याचे ते म्हणाले.
चिंचोली येथील आंबेडकर संग्रहालयाचे उद्घाटन लवकरच होणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.