|| महेश बोकडे

कंत्राटदारांचे एक कोटी रुपये थकल्याचा फटका

नागपूर :  सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील विस्तारीकरणाचे बांधकाम कंत्राटदारांनी थांबवले आहे. शासनाने येथील कंत्राटदारांचे जुन्या देयकातील १ कोटी रुपये अद्याप दिले नाहीतच शिवाय बांधकामासाठी आणखी आवश्यक असलेले ४ कोटी रुपयेही अडकले आहेत. त्याचा फटका या प्रकल्पाला बसत असून येथील तीन वार्डाचे बांधकाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

हृदय, मूत्रपिंड, यकृत, गॅस्ट्रोइंट्रोलॉजी, मेंदूशी संबंधित गुंतागुंतीचे उपचार होणारे सुपरस्पेशालिटी हे मध्य भारतातील एकमेव शासकीय रुग्णालय आहे. केवळ याच रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची सोय आहे. येथे विदर्भ, मराठवाडय़ासह शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा येथूनही उपचारासाठी रोज मोठय़ा संख्येने अत्यवस्थ रुग्ण येतात. या रुग्णांच्या तुलनेत येथे सगळ्याच सुविधा अपुऱ्या पडतात. या रुग्णांसाठी केंद्र सरकारने २०१० च्या दरम्यान मेडिकलमध्ये १५० कोटींच्या प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेला मंजुरी दिली होती. त्यात सुपरस्पेशालिटीच्या विस्तारीकरणाचाही समावेश होता.

या योजनेनुसार, १२५ कोटींचा वाटा केंद्र तर २५ कोटी रुपये राज्य शासन उचलणार होते. या प्रकल्पासाठी मेडिकल आणि वैद्यकीय शिक्षण खात्याने तातडीने प्रक्रिया न केल्याने काही वर्षे हा निधी पडून राहिला. त्यानंतर यंत्र खरेदीसह इतर अनेक घोळ झाल्याने योजना लांबणीवर पडली. परिणामी, बांधकामासह इतरही खर्च वाढले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपरस्पेशालिटीच्या विस्तारीकरणाला गती देण्याची सूचना करत काही निधी दिला.

हाही निधी कमी असल्याने कंत्राटदारांचे जुन्या देयकातील १ कोटी रुपये थकले आहेत. त्यातच येथील तीन वार्डाच्या बांधकामासह विद्युतीकरणासाठी आणखी ४ कोटींची गरज आहे. हा निधी मिळत नसल्याने कंत्राटदाराने जवळपास काम थांबवले आहे. या प्रकाराने आधीच लांबणीवर पडलेला प्रकल्प कार्यान्वित होण्याला आणखी विलंब होणार आहे. याचा फटकाही येथील रुग्णांनाच बसणार आहे. काही दिवसांपूर्वी वैद्यकीय सचिव संजय मुखर्जी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आले होते. त्यांनी घेतलेल्या बैठकीत हा प्रकार पुढे आला.

‘‘सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे विस्तारीकरण तातडीने करण्यासाठी शासन आग्रही आहे. त्यासाठी वैद्यकीय सचिव डॉ. संजय मुखर्जी आणि संचालक डॉ. तात्याराव लहाने स्वत: या विषयात लक्ष घालत आहेत. कंत्राटदाराला पैसे देण्याचे आश्वासन दिले असून तो लवकरच काम सुरू करेल.’’ – प्रा. डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.