चंद्रशेखर बोबडे

विदर्भ-मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा या संत्रीपट्टय़ातील शेतकऱ्यांना संत्री उत्पादनाबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे अभियान ‘टेक्नॉलॉजी मिशन ऑन सिट्रस’ (टीएमसी) बंद होण्यास वैदर्भीय लोकप्रतिनिधींची उदासीनताच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय कृषी खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून ३१ मार्च २०२० पासून हे अभियान राबवण्यात येत होते. ते बंद होऊ नये, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र केंद्र सरकारने निधी देणे बंद केल्याने अभियान पुढे चालवणे अशक्य असल्याचे या अभियानाचे प्रमुख मिलिंद लदानिया यांनी सांगितले.

केंद्र सरकारने या अभियानास निधी द्यावा म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे म्हणून आवाहन करण्यात आले होते. मात्र कोणीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. संत्री उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, रोगमुक्त कलमे तयार करणे, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करणे, शेतकरी आणि अधिकारी यांना प्रशिक्षण देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना झाला होता. येथे तयार होणाऱ्या रोगमुक्त कलमाची मागणी वाढली होती. आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मिळणाऱ्या मार्गदर्शनातून संत्री उत्पादक उच्च प्रतीच्या (निर्यातक्षम) संत्र्याचे उत्पादन घेऊ लागले होते. अलीकडेच या भागातील संत्री दुबईच्या बाजारपेठेत गेली होती. विदर्भात नागपूर आणि अमरावती या दोन प्रमुख जिल्ह्य़ांसह काही भागांत एकूण ४० लाख हेक्टर्समध्ये संत्र्याची लागवड केली जाते.

संपूर्ण देशात आणि विदेशातही नागपूरच्या संत्र्यांना भाव आहे. २००६ मध्ये विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असता तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी विदर्भाला भेट दिली होती. त्यांच्या दौऱ्यानंतर संत्री उत्पादकांसाठी वरील प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते.

‘टीएमसी’च्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रोगमुक्त कलमांना शेतकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात मागणी होती. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञानाची माहिती मिळत होती. अभियान बंद झाल्यास विदर्भातील संत्री उत्पादकांचे नुकसान होणार आहे.

– अमिताभ पावडे, संत्री उत्पादक व कृषी अभ्यासक

विदर्भात अनेक वर्षांपासून एकच वाण आहे. त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळेच विदेशातील बाजारपेठेत संत्र्याची मागणी वाढेल. इस्रायलमध्ये १२ प्रजाती आहे. त्यापैकी पाच हे बीविरहित आहेत. स्पेनमध्ये पाच प्रजाती आहे. आपल्याकडेही संशोधनाच्या माध्यमातून प्रजातींची संख्या वाढावी.

– श्रीधर ठाकरे, कृषी अभ्यासक