६० ते १०० स्वयंसेवकांना  लस देणार

नागपूर : ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित होणाऱ्या कोव्हिशील्ड या करोनावरील लशीची मानवी चाचणी देशातील १७ केंद्रांवर होणार असून त्यात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचाही समावेश आहे. येथील ६० ते १००  स्वयंसेवकांना ही लस टोचली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत ही चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे.

या लशीची प्राथमिक चाचणी यशस्वी झाल्यांतर पुण्यातील एका कंपनीला लस तयार करण्यास सरकारची मान्यता मिळाली आहे. पण केवळ भविष्यातील वापरासाठी. एसआयआयची कोव्हिशील्ड ही लस लवकरच उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे. या लसीची  चाचणी अंतिम टप्प्यात असून सरकारची मंजुरी मिळेल तेव्हाच ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  भारतातील १७ केंद्रांवर सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक्षमतांची मानवी चाचणी करण्यास परवानगी मिळाली असून त्यात मेडिकलचा समावेश आहे.  निकषांवर ही लस यशस्वी ठरणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या लसीच्या मानवी चाचणी मेडिकलमधील निरीक्षक म्हणून मेडिकलच्या पल्मोनरी क्रिटिकल केअर मेडिसीनचे विभागप्रमुख आणि कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूचे प्रमूख डॉ. सुशांत मेश्राम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ही लस माकडांवर पूर्णपणे यशस्वी ठरली. त्यांच्यात कोविड —१९ विरोधात प्रतिकारशक्ती विकसित झाली. यानंतर माणसावर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. भारत, ब्राझीलसह जगातील अनेक देशांमध्ये चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. भारतामध्ये दिल्लीतील एम्स, मुंबईतील केईम, पुण्यामुंबईत चाचणी सुरू झाली आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात मेडिकलमधील मानवी चाचणी करणाऱ्या पथकात मेडिकलचे  अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. शिल्पा गुप्ता, डॉ. सुशांत मुळे, डॉ. रवि यादव, डॉ. एलिना अ‍ॅलेक्झांडर यांचा समावेश आहे.

या लसीच्या चाचणीसाठी मेडिकलची निवड होणे ही नागपूरकरांसाठी भुषणावह बाब आहे. आठ दिवसांपुर्वी प्राधान्य परवाना मिळाला आहे. यानंतर आम्ही चाचणीची प्रक्रिया प्रोटोकॉलनुसार करण्यासाठी तयारी केली आहे. चाचणीचा पहिला डोस देण्यास दोन दिवसानंतर सुरुवात होईल. मेडिकलमध्ये डॉ. सुशांत मेश्राम यांच्या  पथकाच्या परिश्रमातून चाचणीचा टप्पा यशस्वी होईल.

— डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.