सापळा रचून एकाला रंगेहात पकडले

खास प्रतिनिधी, नागपूर</strong>

भूमापन कार्यालयातील भ्रष्टाचाराचे पुरावे असतानाही एकाने ते प्रकरण उघड न करण्यासाठी महिला अधिकाऱ्याला तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. हा धक्कादायक प्रकार अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला २ लाख ३० हजार रुपये घेताना रंगेहात पकडले असून दोघेजण फरार आहेत.

कृष्णा वासुदेव इंगोले (२२) रा. भरतवाडा, कळमना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे तर संदीप वसंत देशपांडे रा. झेंडा चौक, महाल आणि जय सुरेश अग्रेकर (४०) रा. सीए मार्ग अशी फरार आरोपींची  नावे आहेत. हे आरोपी स्वत:ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगायचे.

डॉ. सारिका रामकृष्ण कडू (४०) रा.  उत्कर्ष-अनुराधा सोसायटी, सदर असे फिर्यादी महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या सिव्हील लाईन्समधील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या नगर भूमापन-१ क्रमांकाच्या कार्यालयात कार्यरत आहेत.या कार्यालयात काही कर्मचारी लाच घेऊ न कामे करीत असल्याचे व अनेक अनधिकृत प्रकरणात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार करीत असल्याचे पुरावे संदीप देशपांडे याने गोळा केले. काही गैरव्यवहारासंदर्भातील दस्तावेजांचे छायाचित्र व चलचित्र काढले व त्या माध्यमातून कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणण्याची धमकी कडू यांना दिली. यातून वाचायचे असल्यास तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. गैरव्यवहार चव्हाटय़ावर येण्याच्या भीतीने कडू यांनी त्याला खंडणी देण्याची तयारी दर्शवली. पण, त्यांनी प्रथम केवळ ७० हजार रुपये उपलब्ध असल्याचे सांगितले. ते पैसे आरोपींनी क्रिष्णा याच्या हाताने रविनगरमध्ये स्वीकारले.

उर्वरित पैशासाठी तगादा

महिला अधिकारी घाबरली असून पहिला हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित २ लाख ३० रुपये घेण्यासाठी आरोपी त्यांना वारंवार संपर्क करू लागले. पैसे नसल्याने त्यांनी वेळ मागितली. पण, आरोपी घरात शिरून सर्व प्रकार उजेडात आणायची व मारण्याची धमकी देऊ लागले. त्यामुळे कडू या अनेक दिवस तणावात होत्या. शेवटी त्यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांना सर्व हकिकत सांगितली. कडू यांनी आरोपीला भ्रमणध्वनी करून पैसे  तयार असल्याचे सांगितले. आरोपीने रविनगर चौकात भेटायला बोलावले. आरोपीने पैसे स्वीकारताच कडू यांनी गुन्हे शाखा पोलिसांना इशारा केला.