करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर देशभरातील रेल्वेने होणारी मालवाहतुकीची गती दुपटीहून अधिक वाढली आहे. त्यामुळे पट्रोल, डिझेल आणि एलपीजीची ने-आण वेगवान झाली आहे. एवढेच नव्हेतर वीजनिर्मिती प्रकल्पांना होणारा कोळसा पुरवठाही अधिक गतीने होऊ लागला आहे.

प्रवासी गाडय़ा नसल्याने मालगाडय़ांना ‘मेन लाईन’वरून चालवण्यात येत आहे. म्हणून ही गती वाढली आहे, असे मध्य रेल्वेचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव यांनी सांगितले.

टाळेबंदी असली, तरी मालवाहतूक सुरू आहे. एरव्ही राजधानी, शताब्दी, दुरान्तो आणि इतर महत्वाच्या गाडय़ांना मार्ग मोकळा करण्यासाठी  मालगाडीला विविध ठिकाणी थांबवून ठेवण्यात येत होते. आता प्रवासी गाडय़ा नसल्याने सारा मार्ग मालगाडय़ांसाठी खुला झाला असून आधी २५ किलोमीटर प्रतितास धावणारी मालगाडी चक्क ६० किलोमीटर प्रतितास धावू लागली आहे, असे रेल्वेतील परिचालन विभागातील अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

रेल्वे बोर्डाने टाळेबंदीनंतर  मालगाडय़ांना ‘मेन लाईन’ (अप अँड डाऊन)वरून चालवण्यात यावे. शक्यतो मालगाडीला ‘लूप लाईन’वरून चालवण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत.  एरव्ही रेल्वेस्थानक यार्ड परिसरात मालगाडीला ‘लुप लाईन’वरून चालण्यात येत होते. त्यामुळे पाईंट बदलण्यात वेळ जात होता. शिवाय  या मार्गावरून गाडीची गती अतिशयक कमी केली जाते. त्याचा परिणाम मालवाहतुकीच्या गतीवर व्हायचा. आता तो अडथळा नाही.

राज्यातील परळी, नाशिक, पारस, कोराडी आणि मौदा तसेच मध्य प्रदेशातील सारणी आणि सिंगाजी येथील वीजनिर्मिती प्रकल्पांना मध्य रेल्वे कोळसा येतो. बल्लारशाह येथील कोळसा खाणीतून नाशिक येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला कोळसा नेण्यात सुमारे तीन तासांची बचत झाली आहे

* मध्य रेल्वेने गेल्या दहा दिवसात  २८,५५५ व्हॅगन आणि ५५० गाडय़ांनी मालवाहतूक केली.

* यात १६,९६४ व्हॅगन कोळशाच्या, २४४३ व्हॅगन पेट्रोलियम पदार्थाच्या, ७०५९ कंटेनर, ४७५ खतांच्या, ४२ धान्य, ८४ व्हॅगन साखर तसेच ८४ व्हॅगन कांदे आणि इतर जीवनाश्यक वस्तूंच्या ६७६ व्हॅगन आहेत.