|| देवेश गोंडाणे

 

पीएच.डी. परीक्षकांचे मानधन अनेक वर्षांपासून थकित

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीएच.डी. सेलच्या अनागोंदी कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. पीएच.डी. सेलने भौतिकशास्त्र विषयाचा शोधप्रबंध चक्क मराठी विषयाच्या परीक्षकाकडे पाठवला. परीक्षकांनी यासंदर्भात विद्यापीठाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही वर्षभर तो प्रबंध त्या परीक्षकांकडेच पडून राहिल्याने पीएच.डी. सेलचे पितळ उघडे पडले आहे. पीएच.डी.च्या परीक्षकांना देण्यात येणारे मानधनही अनेक वर्षांपासून थकित असल्याची खंत काही परीक्षकांनी व्यक्त केली आहे.

पीएच.डी. शोधप्रबंधाचे मूल्यांकन करणाऱ्या परीक्षकांना ५०० रुपये मानधन देण्याची तरतूद आहे. परंतु, अनेक परीक्षकांचे हे ५०० रुपयांचे मानधन देखील अनेक वर्षांपासून थकीत आहे. दुसरीकडे लाखो रुपयांच्या चहा कॉफीची बिले मात्र विद्यापीठाकडून नियमित भरली जात आहेत. विद्यापीठाकडून संबंधित परीक्षकांशी योग्यरितीने पत्रव्यवहार देखील केला जात नसल्याची तक्रार काही परीक्षकांनी केली आहे. परीक्षकांनी पाठवलेले स्वीकृती पत्र किंवा अहवाल वगैरे सर्व डाक केवळ महिन्यातून एकदाच उघडली जाते. प्रशासनाच्या या लेटलतिफीचा फटका संशोधकांना बसला असून शोधप्रबंध जमा करूनही विद्यार्थ्यांना दोन ते तीन वर्षे पीएच.डी. बहाल केली जात नाही.

परीक्षकाचे नाव  गोपनीय ठेवले जाते. परंतु, ही गोपनियता सर्रास भंग केली जात आहे. विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन परीक्षकांचे नाव उघड केले जात आहे. त्यामुळे काही विद्यार्थी, मार्गदर्शक थेट परीक्षकांशी संवाद साधतात. याबद्दल अनेक परीक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व गोंधळाकडे विद्यापीठ प्रशासनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. या आर्थिक देवाणघेवाणीचा वाटा विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत तर जात नसावा, अशी शंकाही आता विद्यार्थी उपस्थित करायला लागले आहेत.

आर्थिक देवाणघेवाण

पीएच.डी. सेल मधील काही कर्मचारी हे या विभागात १०-१५ वर्षांपासून ठाण मांडून आहेत. या विभागातील अनेक कर्मचारी संशोधक विद्यार्थ्यांना पैशांची मागणी करीत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यात पीएच.डी. सेल मधील दोन लिपिकांची नावे आघाडीवर आहेत. शोधप्रबंधाचा अहवाल लवकर आणून मौखिक परीक्षा लवकर लावण्याचे आमिष दाखवून पैशांची मागणी केली जात असल्याचे संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले.

‘शोधगंगा’वर प्रबंधच नाही

महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांचे विविध विषयांचे हजारो प्रबंध शोधगंगा या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परंतु नागपूर विद्यापीठाकडून २००९ ते २०१९ या कालखंडात या संकेतस्थळावर केवळ दोन विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध दिसतात. विशेष म्हणजे, नागपूर विद्यापीठाने यूजीसी आणि शोधगंगा यांच्याशी सामंजस्य करार  केला आहे. शोधगंगा या संकेतस्थळावर नागपूर विद्यापीठाच्या समन्वयक म्हणून विद्यापीठाच्या माहिती शास्त्रज्ञ डॉ. विणा प्रकाशे यांचे नाव झळकत आहे. मग विद्यापीठाकडून प्रबंध अपलोड का केले जात नाही, हा खरा प्रश्न आहे.