आज मराठी भाषा दिन
‘मराठी असे आमुची मायबोली’ असे आज बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल आहे. विद्यार्थ्यांंचा इंग्रजीकडे वाढता ओढा बघता महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये मराठी भाषेच्या विद्याथ्यार्ंची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या शाळांमध्ये केवळ ३० टक्के मराठी आणि ७० टक्के हिंदी, उर्दू आणि इतर भाषक विद्यार्थी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मराठी शाळांमध्ये मराठी भाषिकांची संख्या कमी होत असताना आणि इंग्रजी शाळांकडे असाच ओढा राहिला तर येणाऱ्या काळात मराठी शाळांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे परिणामी मराठी भाषिक शिक्षकांची संख्या कमी होईल.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांमध्ये मराठी विषय ऐच्छिक न ठेवता तो आवश्यक करावा, असे आदेश असताना उपराजधानीत अनेक जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी शाळांमध्ये हा विषय ऐच्छिक म्हणून त्याकडे बघितले जाते. महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या दोन वर्षांत मराठी विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. जवळपास ७० टक्के विद्यार्थी हिदी भाषक तर केवळ ३० टक्के विद्यार्थी मराठी भाषक आहेत. तशीच परिस्थिती जिल्हा परिषदेच्या काही शाळांची झाली आहे. राज्याचा शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात, शैक्षणिक संस्थांमध्ये मराठी भाषेत सर्व कारभार चालावा, असा आदेश त्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही.
नागपूर शहरात महापालिकेच्या १९४ शाळा असल्याची महापालिकेत नोंद असली तरी सध्या प्रत्यक्षात मात्र १८६ शाळा सुरू आहेत. त्यातील ११२ शाळा हिंदी व उर्दू माध्यमाच्या असून, याच भाषांच्या मुलांची संख्या जास्त आहे तर मराठी शाळा अवघ्या ७४ असून, गेल्या दोन वर्षांत त्या शाळांमधील ४० टक्के विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे परिणामी शाळांची संख्याही कमी झाली असल्याचे समोर आले आहे. साधारणत: उत्तर आणि पूर्व नागपुरातील महापालिकेच्या शाळांची स्थिती बघितली तर त्या भागात ६५ शाळा असताना या शाळांमध्ये ७० टक्के विद्यार्थी हे उर्दू आणि हिंदी भाषक आहेत तर ३० टक्के विद्यार्थी केवळ मराठी भाषक आहे. या ३० टक्क्यांपैकी २५ टक्के विद्यार्थी झोपडपट्टीत राहणारे असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. गेल्या पाच-सहा वषार्ंत शहर आणि जिल्ह्य़ात इंग्रजी शाळांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्या शाळांमध्ये इंग्रजी भाषेसंदर्भात जास्त लक्ष दिले जात असताना मराठीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक मराठी शाळेतील विद्याथ्यार्ंची संख्या घटल्याने त्या शाळेतील शिक्षक कमी करण्यात आले आहेत. त्यांना हिंदी माध्यमांच्या शाळेत पाठविण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्या ठिकाणी सोयी सुविधा दिल्या जात नाही, त्यामुळे मुस्लिम समाजातील सदस्य शिक्षणाबाबत नेहमीच ओरड करीत असतात. मात्र, त्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. पूर्व, उत्तर आणि मध्य नागपुरातील अनेक महापालिका शाळांची अवस्था फारच गंभीर आहे. महापालिकेची चार कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात ती उर्दू माध्यमांची आणि एक इंग्रजी माध्यमाचे आहे. मराठी माध्यमाचे कनिष्ठ महाविद्यालय नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाचे अनेक अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी महिनोंमहिने शाळांचा दौरा करीत नाहीत, त्यामुळे अनेक शिक्षक काय करतात, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा कसा आहे, याची माहिती महापालिकेकडे नसल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.