सणासुदीच्या काळात स्वस्त दरात डाळ विक्री करण्याची तयारी दर्शवून शहरातील बडय़ा डाळ विक्रेत्यांनी त्यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईला तर ब्रेक लावलाच आहे. त्याचबरोबर भविष्यात डाळीचे दर कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याकडे असलेला साठाही या निमित्ताने बाजारभावानुसार विकण्याचीही तजवीज केली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने ही बाब फेटाळून लावली आहे. यानिमित्ताने बाजारात मुबलक डाळ उपलब्ध होऊन दर कमी होईल व याचा ग्राहकांनाच फायदा होईल, असा दावा केला आहे.
तूर डाळीचे दर अचानक गगनाला भिडल्याने राज्य सरकारने साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्यावर व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते. नागपूर जिल्ह्य़ात ७०० क्विंटल तूर डाळीचा साठा जप्त करण्यात आला होता. ही कारवाई याच गतीने सुरू राहिल्यास आपले काही खरे नाही ही बाब ओळखून व्यापाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्वस्त डाळ विक्रीचा प्रस्ताव दिला आणि तो मान्यही करून घेतला. खुद्द मुख्यमंत्र्यांचेच पाठबळ मिळाल्याने स्थानिक प्रशासनालाही व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याशिवाय पर्याय नव्हता.
पहिल्या टप्प्यात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणारी वीस हजार क्विंटल (तूर आणि चना डाळ प्रत्येकी दहा हजार क्विं.) डाळ आयात केलेली असणार आहे, असे व्यापारी सांगत असले तरी व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेली डाळच या निमित्ताने आता बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे. कारण कारवाईचा दबाव त्यांच्यावर आहे.
दुसरीकडे बाजारातील तुटवडा दूर करण्यासाठी व दर नियंत्रित करण्यासाठी सरकार मोठय़ा प्रमाणात डाळ आयात करू लागले आहे तसेच नवीन डाळही बाजारात येण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर पुढच्या काळात डाळीचे दर खाली येऊ शकतात. असे झाले तर साठेबाजांना यातून आर्थिक फटका बसू शकतो. ही बाब चाणाक्ष व्यापाऱ्यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. एकीकडे कारवाईची टांगती तलवार आणि दुसरीकडे भविष्यात भाव कोसळण्याची शक्यता आदी बाबी लक्षात घेऊनच व्यापाऱ्यांना ग्राहक हित आठवल्याची चर्चा आहे.
दरम्यान, साठेबाजांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले असले तरी खुद्द व्यापाऱ्यांच्या प्रस्तावावरच अमल होत असल्याने या कारवाईवरही काही प्रमाणात मर्यादा येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी डाळ विक्रीचा पर्याय सर्व किरकोळ व्यापाऱ्यांसाठीही खुला ठेवला आहे.
ही डाळ विक्री थेट स्वस्त धान्य दुकानातून केली असती तर आपोआपच बाजारातील भाव कमी झाले असते. मात्र हा पर्याय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे.