महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी उपस्थित केलेल्या वेगळ्या विदर्भाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर न केल्याने शिवसेना आमदार आक्रमक झाल्याने अध्यक्षांना सभा १० मिनिटांसाठी तहकूब करावी लागली.
अ‍ॅड. अणे यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात भूमिका मांडली होती. यावर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी हक्कभंगाची सूचनाही सभागृहात मांडली होती. मात्र, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ती फेटाळून लावली. यासंदर्भात मुख्यमंत्री निवेदन देतील, असे जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत निवेदन केले मात्र, विधानसभेत केले नाही, या मुद्दय़ाला धरून विरोधकांनी सदनाचा अपमान होत असल्याचे बजावले. प्रश्नोत्तरानंतर शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी आधी विधानसभेत निवेदन द्यायला हवे होते, असे म्हटले आणि ते अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत गर्दी करू लागले. त्यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता बोलण्यासाठी उभे होते. मात्र, शिवसेना आमदारांच्या अखंड महाराष्ट्राच्या घोषणांमध्ये त्यांचा आवाज लुप्त झाला. दुसऱ्या बाजूला विकास कुंभारे, सुधाकर कोहळे आणि मल्लिकार्जून रेड्डी यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा द्यायला सुरुवात केली. या धामधुमीत अध्यक्षांनी दोन्ही बाजूंच्या सदस्यांना शांत करून वरच्या सभागृहात निर्माण झालेल्या परिस्थितीनुरूप आणि सभापतींच्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावे लागले. जे झाले ते झाले, त्याने काही बिघडत नाही, असे मत प्रदर्शित केल्याने जयंत पाटील यांनी हरकत घेतली.

श्रीहरी अणेंना बडतर्फ करा-गोऱ्हे
श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करून १०५ हुताम्यांचा अनादर केला आहे. त्यामुळे त्यांना महाधिवक्तापदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. अणेंना बडतर्फ करेपर्यंत शिवसेना सभागृहात आणि सभागृहाबाहेर आपली भूमिका मांडत राहील. त्यामुळे अणे यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी आज विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली. मात्र, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा स्थगन प्रस्ताव अमान्य केला.

‘वसंतराव नाईक स्मृती सभागृह तयार करा’
नागपूरच्या राजभवन परिसरात वसंतराव नाईक स्मृती सभागृह तयार करण्याच्या मागणीकरिता गुरुवारी विधानसभेच्या पायरीवर काँग्रेसच्या आमदारांनी आंदोलन केले. याप्रसंगी इतरही मागण्या शासनाकडे लावून धरण्यात आल्या. आंदोलनात माणिकराव ठाकरे, प्रा. जोगेंद्र कवाडे, अ‍ॅड. अनंत गाडगीळ यांचा समावेश होता.

बनावट औषध कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हे
अ‍ॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक पदार्थाच्या मिश्रनातून तिसरेच उत्पादन करणाऱ्या मे. सिटी हर्बल प्रा. लि. या बनावट औषध कंपनीवर अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी छापा मारून चार संचालकांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली. ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी तालुक्यातील पिंपळस येथील जय अंबे भूमीवर्ल्डमध्ये असलेल्या मे. सिटी हर्बल या बनावट औषध कंपनीवर केलेल्या कारवाईबाबत मुलुंडचे आमदार सरदार तारासिंह आणि जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.