सिद्धार्थ ठक्कर सर्वात कमी वयाचा मानकरी; २०० किलोमीटरचे अंतर १२ तास ४५ मिनिटात पूर्ण
सायकलचा प्रवास कधीकाळी श्रीमंतीचे लक्षण होते. मुळातच सायकल असण्यावर श्रीमंतांची मक्तेदारी होती. नंतर इंधनावर आधारित वाहने आली आणि श्रीमंतांच्या सायकलींवर गरिबांची मक्तेदारी झाली. दरम्यानच्या काळात त्यांनीही इंधनावर आधारित वाहनांचा आधार घेतला आणि सायकल काळाच्या पडद्याआड जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली. मात्र, आता पुन्हा सायकलचा प्रवास वेगात सुरू झाला आहे, पण तो सुदृढ आरोग्याच्या दिशेने. त्यातूनच ब्रेव्हेट ही संकल्पना जन्माला आली आणि विदर्भाताल पहिली ‘नाईट ब्रेव्हेट’ शनिवारी मध्यरात्री नागपुरातून आयोजित झाली.
नागपुरातील ब्रेव्हेट पूर्ण करणाऱ्या सायकलपटूंच्या चमूने आयोजित केलेल्या विदर्भातील पहिल्या ‘नाईट ब्रेव्हेट’चा मानकरी १५ वर्षांचा सिद्धार्थ ठक्कर ठरला. १३.५ तासात हे अंतर पूर्ण करायचे होते, पण सिद्धार्थने हे २०० किलोमीटरचे अंतर १२ तास ४५ मिनिटात पूर्ण केले. २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचे ब्रेव्हेट पार करणाऱ्या जितेश ठक्कर यांचा तो मुलगा आहे. ब्रेव्हेटमध्ये सहभागी होणारा सायकलपटू हा १८ वर्षांच्या वरच असावा लागतो.
१५ वर्षांच्या वर आणि १८ वर्षांच्या आतील तो सायकलपटू असेल आणि वडील सोबत असतील तर ब्रेव्हेटमध्ये सहभागी होण्याची परवानगी त्याला नियमानुसार मिळू शकते. याच नियमाच्या आधारे सिद्धार्थला ही संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले.
यापूर्वीसुद्धा तारिक सानी आणि त्यांचा मुलगा आसीम सानी यांनी एकत्रितरीत्या ब्रेव्हेट पूर्ण केली होती. मात्र, ही ब्रेव्हेट दिवसा आयोजित केलेली होती आणि आसीमने वयाची १८ वष्रे पूर्ण केली होती. डॉ. अमीत समर्थ यांनी ६.५३ मिनिटात २०० किलोमीटरची ‘नाईट ब्रेव्हेट’ पूर्ण केली. याकरिता सुमारे ४८ सायकलपटूंनी नोंदणी केली. ४४ सायकलपटू यात सहभागी झाले आणि २९ सायकलपटूंनी ‘नाइट ब्रेव्हेट’ पूर्ण केली.
शनिवार, १६ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता सुरू झालेला हा उपक्रम रविवार, १७ एप्रिलला सकाळी ७.३० ला पूर्ण झाला. यात औरंगाबाद येथील नितीन घोरपडे, तसेच वाशीममधील पाच, वध्र्यातील सहा आणि उर्वरित सायकलपटू हे नागपूरचे होते. विदर्भातील तापमानाचा चढता पारा पाहूनच ‘नाईट ब्रेव्हेट’ची ही संकल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात आणली, असे संयोजकांनी सांगितले.

नव्याने ऊर्जा मिळाली अन्..
हा खूप अविस्मरणीय अनुभव होता. विरुद्ध दिशेने असणारा वारा आणि चढाव यामुळे सुरुवातीला लक्ष्य गाठणे जरा कठीण वाटत होते. १०० किलोमीटरचे अंतर पार केले आणि नव्याने ऊर्जा मिळाली व २०० किलोमीटरच्या ‘नाईट ब्रेव्हेट’चा मानकरी होता आले, असा अनुभव सिद्धार्थ ठक्कर यांनी सांगितला.

अन् स्वप्न साकारले..

मुलासोबत ब्रेव्हेटमध्ये सहभागी होणे हा अविस्मरणीय अनुभव होता. मला नेहमीच वाटत होते सिद्धार्थसोबत हे लक्ष्य गाठता यावे आणि आज त्यात आम्ही यशस्वी झालो. माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, अशी प्रतिक्रिया सिद्धार्थचे वडील जितेश ठक्कर यांनी दिली. एन्सायक्लोपिडियाचे अनिरुद्ध रईंच यांना त्यांनी विशेष धन्यवाद दिले.

अविस्मरणीय अनुभव..

-अतिशय कमी वेळेत ‘नाईट ब्रेव्हेट’ पूर्ण करणारे डॉ. अमित समर्थ म्हणाले, रात्रीचे तापमानसुद्धा कमी नव्हते. परिस्थितीही ब्रेव्हेटला साजेशी नव्हती. त्यामुळे हा अनुभव न विसरण्यासारखा आहे.