नागपूर : सहचारिणीच्या शोधासाठी त्याने एकटय़ानेच एका जिल्ह्य़ातून दुसरा जिल्हा गाठला. यादरम्यान तब्बल तीन हजार किलोमीटरच्या प्रवासात त्याने इतरत्रही शोधाशोध सुरूच ठेवली. आता त्याच्यासाठी सहचारिणी आणण्याची जबाबदारी इतरांनी स्वीकारली, तर टाळेबंदीने त्यावर पाणी फेरले. यवतमाळ जिल्ह्य़ातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘वॉकर’ वाघ आता बुलडाणा जिल्ह्य़ातील ज्ञानगंगा अभयारण्यात आज ना उद्या सहचारिणी मिळेल, या आशेवर स्थिरावला आहे.

यवतमाळ जिल्ह्य़ातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘टी१सी१’ या वाघाने तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास करुन वन्यजीव तज्ज्ञांना विचार करायला भाग पाडले. टिपेश्वर ते तेलंगणाजवळील आदिलाबादच्या जंगलापर्यंत तसेच पैनगंगा अभयारण्य ते औरंगाबादमधील ज्ञानगंगा आणि अजिंठा डोंगरापर्यंतचा प्रवास करत या वाघाने साऱ्यांनाच चकित के ले होते. यादरम्यान त्याने जंगलासह महामार्ग, नद्या, शेती यातून वाट शोधली. एकाठिकाणी तो फार काळ स्थिरावला नाही. अलीकडच्या काही महिन्यात तो ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला असून  या अभयारण्यातील गाभा क्षेत्रातील ५२ चौरस किलोमीटरचे क्षेत्र त्याने व्यापले आहे. त्यामुळे त्याची ही वाटचाल जोडीदाराच्या शोधात असल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्याचा ज्ञानगंगातील मुक्काम पाहता त्याच्यासाठी जोडीदार शोधावा का, यावर निर्णय घेण्याकरिता वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीच्या दोन बैठकाही झाल्या. २८ मार्चला ज्ञानगंगा अभयारण्यात अंतिम बैठक घेऊन याबाबतचा निर्णय होणार होता. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर करण्यात आली. ती संपेल या आशेवर दोनदा अंतिम बैठकांच्या तारखा बदलण्यात आल्या. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदी वाढतच गेली. त्यामुळे सध्या या वाघासाठी सहचारिणी शोधण्याचा प्रवास थांबवण्यात आला आहे. तीन हजार किलोमीटरनंतर या वाघाचे ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावणे ही या अभयारण्यासाठी एक चांगली संधी असल्याचे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.