लाभार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध थाळ्यांचे व्यस्त प्रमाण

चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : गोरगरिबांना सवलतीच्या दरात भोजन देण्याची शिवसेनेच्या वचननाम्यातील ‘शिवथाळी’ योजनेची अंमलबजावणी करण्याचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी गोरगरिबांची सरकार दरबारी नोंद असलेली संख्या आणि उपलब्ध थाळ्या यांचे व्यस्त प्रमाण बघता गरिबांना तरी ही थाळी मिळेल किंवा नाही, याबाबत साशंकता आहे.

राज्य शासनाने गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी दहा रुपयात एक थाळी उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. त्याला ‘शिवथाळी’ असे नाव देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी नवीन वर्षांत केली जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही वर्षांच्या पहिल्या तारखेला जारी करण्यात आला आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार, गोरगरीब, विविध क्षेत्रातील मजूर, निराधार व तत्सम लोकांसाठी ही योजना आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणाऱ्या या योजनेनुसार राज्यात दर दिवशी १८ हजार थाळ्यांचे वितरण केले जाईल. यात नागपूर शहराच्या वाटय़ाला ७५० थाळ्या येणार आहेत.

शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात आहे. योजनेतील तरतुदीनुसार गरिबांसाठी म्हणजे दारिद्रय़ रेषेखालील लोकांसाठी ही योजना असल्याचे मान्य केले तरी अशा लोकांसाठी असलेल्या शिधापत्रिका धारकांची संख्या ही २ लाख १७ हजार ३३६ आहे. मजुरांसाठी ही योजना असल्याचे आदेशात नमूद आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांची संख्या ७४ हजार ७१२ (मार्च २०१९ पर्यंत) आहे. शहरात बांधकाम कामगारांचे ६० ते ७० ‘ठिय्ये’ आहेत. यावर ५० ते ५०० कामगार रोज सकाळी काम शोधण्यासाठी उभे राहतात. त्यांची दररोजची एकूण संख्या लक्षात घेतली तर ती ३ हजार ते ३० हजाराच्या घरात असल्याचे असंघटित कामगार संघटनेचे म्हणणे आहे.

योजना ठरवताना ती गरिबांसाठी असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी गरिबांची व्याख्या किती याबाबत त्यात उल्लेख नाही. शासन दरबारी गरीब म्हणजे दारिद्रय़ रेषेखालील नागरिक. त्यांची संख्या व मजुरांची  संख्या लक्षात घेतली तर ती लाखांवर जात असताना शेकडोंच्या थाळी वाटपातून कोणाचे पोट भरणार हा मोठाच प्रश्न  आहे.

जिल्ह्यात पाच ठिकाणी सुविधा

ही योजना जिल्ह्यातील पाच ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. यात प्रामुख्याने डागा हॉस्पिटल गोळीबार चौक, गणेशपेठ बसस्थानक, मातृसेवा संघ इस्पितळ महाल, कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना मार्केट व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रुग्णालय आदीचा समावेश आहे.

अशी असेल थाळी

दोन चपात्या, प्रत्येकी एक वाटी भाजी, भात, वरण आदीचा समावेश थाळीत असेल. या थाळीची किंमत शहरी भागात ५० तर ग्रामीण भागात ३५ रुपये आहे. कंत्राटदाराला दहा रुपयात ती द्यावी लागेल. उर्वरित रक्कम त्याला शासनाकडून अनुदानाच्या रुपात प्राप्त होईल.

सरकारला दहा रुपयात जेवणाची सोय करण्याची योजना राबवावी लागते, याचा अर्थ लोकांची क्रयशक्ती वाढली नाही हे यातून सिद्ध होते. एकीकडे विविध विकास कामे झाल्याचा दावा करायचा व दुसरीकडे लोकांची क्रयशक्ती कमी करून त्यांच्यासाठी सवलतीच्या योजना जाहीर करायच्या ही गरिबांची थट्टाच आहे.

– जम्मू आनंद, कामगार नेते.