रस्ते बांधकामासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा आकडा वाढला असून गेल्या चार वर्षांत सुमारे दहा हजार २४१ झाडे तोडण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर विभागाने हाती घेतलेल्या रस्ते प्रकल्पाअंतर्गत ही वृक्षतोड झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत दहा रस्ते प्रकल्प हाती घेतले. तब्बल १०८.४१ किलोमीटरच्या या रस्ते प्रकल्पांची किं मत ३ हजार २४४.१५ कोटी रुपये आहे. यातील ६७.७१ किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत ५६०.८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाच्या नागपूर ते उमरेड या ४१.१० किलोमीटरच्या रस्ते चौपदरीकरणात यातील सर्वाधिक चार हजार ७३४ वृक्ष तोडण्यात आले. रस्ता चौपदरीकरणामुळे बरेचसे जंगल नाहीसे झाले. उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यालगतचा हा रस्ता असून वृक्षतोडीमुळे जंगलातील प्राणी बाहेर येऊन मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

त्यापाठोपाठ रस्ते चौपदरीकरणाअंतर्गत सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर-गोंडखरी या पट्टय़ातही सुमारे दोन हजार ८८८ झाडे तोडण्यात आली आहेत. या दोन्ही रस्ते प्रकल्पांचे काम ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू करण्यात आले होते. प्राधिकरणाने बाह्य़ रिंग रोडचीही कामे हाती घेतली आहेत. नागपूर बाहेरील या दोन्ही रिंगरोडकरिता एक हजार २७६ झाडे तोडण्यात आली. जानेवारी २०१७ मध्ये या दोन्ही रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग ५३ आणि ४४ या रस्ते प्रकल्पात मात्र अनुक्र मे ४५ आणि ८८ झाडे तोडण्यात आली. प्राधिकरणाच्या नागपूर विभागाअंतर्गत येत असलेल्या कार्यक्षेत्रात पाच पथकर नाके व दोन तपासणी नाके आहेत.

या काळात एकही नाका बंद करण्यात आलेला नाही, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी विचारलेल्या माहितीतून समोर आले आहे. दरम्यान, आता अजनी इंटरमॉडेल स्थानकाचेही काम प्राधिकरणाकडेच असून त्यासाठी हजारो वृक्ष तोडली जाणार आहेत. शहरतील पर्यावरणवाद्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.