News Flash

‘तू छान दिसतेस’, पोलीस निरीक्षकाचा महिला आरजेला मेसेज; नियंत्रण कक्षात बदली

नागपूरमधील एफएम वाहिनीमध्ये आरजे म्हणून करणाऱ्या तरुणीने वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाकडे वाहतूक शाखेतील नवनियुक्त पोलीस उपायुक्तांचा नंबर मागितला होता.

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकपदावरील अधिकाऱ्याने एका एफएम वाहिनीत आरजे म्हणून काम करणाऱ्या तरुणीला ‘तू खूप छान दिसतेस, तुला बघत रहावंस वाटतं’, असा मेसेज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित आरजे तरुणीने सोशल मीडियावर स्क्रीनशॉट पोस्ट केल्याने हा प्रकार उघड झाला आहे. अखेर या पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

नागपूरमधील एफएम वाहिनीमध्ये आरजे म्हणून करणाऱ्या तरुणीने वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाकडे वाहतूक शाखेतील नवनियुक्त पोलीस उपायुक्त गजानन राजेमाने यांचा मोबाईल क्रमांक मागितला होता. यावर त्या पोलीस निरीक्षकाने तरुणीला व्हिडिओ कॉल करायला सांगितले. फक्त नंबर देण्यासाठी व्हिडिओ कॉलची काय आवश्यकता, असे त्या आरजेने पोलीस निरीक्षकाला विचारले. त्यावर पोलीस निरीक्षकाने रिप्लाय दिला की, ‘तू खूप छान दिसतेस. तुझा चेहरा बघत रहावासा वाटतो. शक्य असल्यास व्हिडिओ कॉल कर’.

पोलीस निरीक्षकाचा हा मेसेज पाहून आरजे तरुणीला धक्काच बसला. तिने सोशल मीडियावर पोलीस निरीक्षकासोबतच्या चॅटिंगचे स्क्रीन शॉट टाकले. आरजे तरुणीची पोस्ट व्हायरल होताच नागपूरमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली.  आरजे तरुणीने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्जही दिला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संबंधित पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली.  याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती. संबंधित पोलीस निरीक्षकाने यापूर्वी जिल्हा परिषदेतील एका महिला अधिकाऱ्यालाही अशाच आशयाचे मेसेज पाठवले होते, असे समजते. तर वेश्याव्यवसायाप्रकरणी ताब्यात घेतलेल्या महिलांसोबतच्या वागणुकीमुळेही हा अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 4:26 pm

Web Title: traffic police inspector sent message to woman rj transferred to control room
Next Stories
1 नागपूर विभागाला जपानी मेंदूज्वरचा विळखा!
2 लोकजागर : टंचाई..पाण्याची की बुद्धीची?
3 उपराजधानीतील उपहारगृहांनाही राजकीय ज्वर!
Just Now!
X