News Flash

मुंबईतील वाहन संख्येवरून परिवहन मंत्री-मुख्यमंत्र्यांत दुमत

वाहनांच्या वाढत्या संख्येने मुंबईची दिल्ली होण्याची फडणवीस यांना भीती

प्रदूषणाला केवळ वाहने कारणीभूत नाहीत – रावते; वाहनांच्या वाढत्या संख्येने मुंबईची दिल्ली होण्याची फडणवीस यांना भीती
मुंबईतील हवा खराब होत असली तरी या प्रदूषणाला केवळ वाहने कारणीभूत नसून वाहनांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. तर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईची दिल्ली होण्यासाठी वेळ लागणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पर्यावरण विभागालाही वाहनांमुळे वाढत असलेल्या प्रदूषणाला आळा घालण्याची गरज वाटत आहे. पण आता मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा आणि कोणत्या उपाययोजना करायच्या, हा गोंधळ कायम आहे.
दिल्लीबरोबरच मुंबईतील हवाही दिवसेंदिवस खराब होत चालली असून मुंबईकरांना व लहान मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांची वाढती संख्या, कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने लावली जात नसल्याने व तो पेटविला जात असल्याने हवेत कण पसरले जातात. कोळशाचे कण, हजारो बांधकामे सुरू असल्याने धूळ व धुरळा आदी कारणांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. दिल्लीत वाहनांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक दिवस सम क्रमांक असलेली, तर दुसऱ्या दिवशी विषम क्रमांक असलेली वाहने, अशी पद्धत अवलंबिली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही काही आदेश दिले आहेत.
या पाश्र्वभूमीवर मुंबईतील वाहनांमुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत विचारता परिवहन मंत्री रावते यांनी मुंबईची दिल्ली होणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मुंबईपेक्षा दिल्लीतील वाहनांची संख्या दुप्पटीहून अधिक आहे. मुंबईत सुमारे ७० लाख प्रवासी उपनगरी व मेट्रो रेल्वेने, तर ४५ लाख बेस्टने प्रवास करतात. रिक्षा व टॅक्सी यांनी लाखो मुंबईकर प्रवास करतात. सार्वजनिक वाहतुकीचा वापर दिल्लीच्या तुलनेत मुंबईत मोठय़ा प्रमाणावर होतो. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळातच आम्ही काही पावले उचलली होती. बेस्टच्या बसगाडय़ांसह रिक्षा, टॅक्सीही सीएनजी व एलपीजीवर आहेत. १५ वर्षांनंतरची वाहने वापरण्यावर र्निबध आहेत. दक्षिण मुंबईतून सुरू होणाऱ्या मुक्त मार्ग, पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्ग यामुळे जलदगतीने वाहतूक होत आहे. किनारपट्टी रस्त्यामुळे (कोस्टल रोड) आणखी मदत होईल. शहरांतर्गत गल्लीबोळांमध्ये वाहतूककोंडी ही प्रत्येक शहरांमध्ये असते, असे मत रावते यांनी व्यक्त केले.

उपाययोजना गरजेची-फडणवीस
वाहतूक कोंडी, वाहनांची वाढती संख्या यामुळे मुंबईची दिल्ली होण्यास फारसा वेळ लागणार नाही. प्रदूषण वाढत आहे. त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. मेट्रो रेल्वेमुळे दिल्ली वाचली आहे. त्यामुळे मुंबईतही मेट्रोचे जाळे उभारावे लागणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 2:29 am

Web Title: transport minister chief disagreement on mumbai vehicle numbers
Next Stories
1 कोल्हापूरचा टोल रद्द
2 विरोधक उदासीन आणि गोंधळलेले – देवेंद्र फडणवीस यांची टीका
3 राष्ट्रगीताविना विधान परिषदेचे कामकाज स्थगित केल्याने सत्ताधारी संतप्त
Just Now!
X