धरणात साठा वाढल्यावरच फेरविचार -पालकमंत्री

नागपूर : पाऊस सुरू असला तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणात पाणी नसल्याने एक महिन्यासाठी सुरू केलेली एक दिवसाआड पाणीकपात पुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. धरणात जोपर्यंत पुरेसा जलसाठा जमा होणार नाही तोपर्यंत ही स्थिती कायम राहू शकते, असे ते म्हणाले.

तोतलाडोह धरण आटल्याने महापालिकेने प्रथम एका आठवडय़ासाठी व त्यानंतर  एक महिन्यासाठी पाणीकपात सुरू केली आहे. यामुळे पाण्याचा वापर कमी झाला. मात्र, धरणातील जलस्तर वाढला नाही. सध्या शहरासह ग्रामीण भागातही पाऊस येत असला तरी जोपर्यंत धरणक्षेत्रात म्हणजे पेंच नदीच्या परिसरात पुरेसा पाऊस होणार नाही तोपर्यंत धरणातील साठा वाढणार नाही, सध्या मृतसाठय़ातूनच पाणी घेतले जात आहे.त्यामुळे जोपर्यंत धरणात पुरेसा पाणीसाठा होणार नाही तोपर्यंत पाणी कपात सुरूच राहील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

महाजनादेश यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांचे लक्ष शहरातील पाणी संकटाकडे वेधले. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले. मध्यप्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तीन हजार कोटी रुपयांची योजना मंजूर केली. याद्वारे पाईपलाईनद्वारे कन्हान नदीचे पाणी धरणात आणण्यात येणार आहे. यामुळे पुढच्या ५० वर्षांची चिंता मिटेल. पाण्यासाठी सुरू असलेले आंदोलन राजकीय स्वरूपाचे आहेत, लोकांना सत्यस्थिती माहिती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेची पाठराखण

पाणी कपातीचे संकट लक्षात घेऊन महापालिकेने काहीही पावले का उचलली नाहीत, असे बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी महापालिकेची पाठराखण केली. हा प्रश्न महापालिकेचा नाही.  शहराच्या मागणीच्या तुलनेत दीडपट पाणी दिले जात नाही. मात्र, धरणातच पाणी नसल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. मागील पाच वर्षे राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यांनी पाण्याचे नियोजन का केले नाही, असे बावनकुळे म्हणाले.

आता उद्यानातही ‘रेन वॉटर हार्वेिस्टग’ ; महापालिका पाच कोटींचा खर्च करणार 

नागपूर  : टंचाईच्या काळात पाण्याचे महत्त्व लक्षात आल्याने महापालिकेने शहरातील निवडक उद्यानात रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. यासाठी तब्बल पाच कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. दरवर्षी पावसाचे पाणी साठवून ठेवण्याचे कुठलेच नियोजन नसल्याने ते वाहून जाते. त्यामुळे जमिनीत पाणीच मुरत नाही. परिणामी जलस्तर कमी होत जातो. यंदा पाऊसच न आल्याने पाणी कपात केली जात आहे.यातून धडा घेत महापालिकेने वाहून जाणारे पाणी जमिनीत साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेिस्टगचा  पर्याय निवडला. दहा झोनमधील निवडक १३० उद्यानांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. काही उद्यानात वाहून जाणारे पावसाचे पाणी विहिरीत सोडण्यात येईल. त्याचा उपयोग वर्षभर करण्यात येईल.रेन वॉटर हार्वेिस्टग ही काळाची गरज आहे. यामाध्यमातून उद्यानातील वाहून जाणाऱ्या  पाण्याचा पुनर्वापर आम्ही करणार आहोत,असे जलप्रदाय विभागाचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले