इसासनीमध्ये २३ कोटींची योजना अद्यापही कागदावरच

शहराच्या सीमाभागावर असलेल्या इसासनीमध्ये नागरिकांना दररोज घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. नागरिकांचे होणारे हाल प्रशासन डोळे मिटून बघत आहे. विशेष म्हणजे, या परिसरासाठी २३ कोटींची विशेष योजना मंजूर झाली आहे, परंतु अद्याप कामालाच सुरुवात न झाल्याने नागरिकांचे असे हाल होत आहेत.

इसासनी हा डोंगराळ भाग असून येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. येथे जलकुंभ आहेत मात्र, त्यामधून पाणीपुरवठा होत नाही.  दर उन्हाळ्यात या भागात ही स्थिती उद्भवते. याशिवाय पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. या भागातील दोन ते तीन विहिरींच्या आधारे तहान भागवली जाते. उन्हाळ्यात विहिरी कोरडय़ा पडत असल्याने त्यामध्ये टँकरने पाणी टाकण्यात येते. दिवसा आड दोन चार टँकर येतात. या विहिरीपासून दोन किमी अंतरावर भीमनगर वस्ती आहे. हा भाग डोंगरावर असून विहीर मात्र खोलगट भागात आहे. त्यामुळे नागरिकांना सायकलवर  प्लास्टिक डबे बांधून पाणी आणावे लागते. बच्चे कंपन्यापासून तर ज्येष्ठांची मोठी गर्दी विहिरीवर होते. याच विहिरीतून परिसरातील राय टाऊनला जलवाहिनीच्या माध्यमातून नियमित पाणीपुरवठा होतो. या भागात बोिरग आहेत, पण त्यांना पाणी नाही. या भागात राहणारी नवव्या वर्गातील नंदनी विनोद वर्मा सांगते, शाळेला उन्हाळ्याच्या सुट्टय़ा लागल्या आहेत. या सुट्टय़ांचा उपयोग सकाळ-सायंकाळ विहिरीतून घरी पाणी नेण्यासाठी करावा लागत आहे. त्यामुळे खेळायला वेळच मिळत नाही. घरापासून विहीर दोन किमी अंतरावर आहे. विहीर खोल भागात असल्याने पाणी भरून नेताना सायकलला धक्का देण्यासाठी एकाला सोबत आणावे लागते.  इसासनीची लोकसंख्या पंधरा हजारांवर आहे. येथे दोन पाण्याच्या टाक्या आहेत मात्र, त्या नेहमीच कोरडय़ा असतात. पंचशीलनगर, शांतीनगर, वागधरा या भागात भीषण पाणीटंचाई आहे.

आमच्या वस्तीमध्ये २० वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. मात्र, त्याची दखल कोणीच घेत नाही. उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. मात्र विहिरीपासून घर दोन किमी अंतरावर असल्याने मोठी कसरत करावी लागते. जलवाहिन्या आणि हातपंप आहेत मात्र पाणी नाही. भूजल पातळी दोनशे फुटाच्या खाली गेल्याने बोरिंग काम करत नाही.    – योगराज येडे, रहिवासी भीमनगर.

येथील पस्थितीची जाणीव मुख्यमंत्र्यांना अनेकदा करून दिली. त्यानंतर २३ कोटी रुपयांची जल स्वराज्य योजना मंजूर करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून रामा डॅम येथून पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. मात्र अजून काम सुरु झालेले नाही. या परिसरात आठ दिवसाआड पाणी मिळते. अन्यथा टँकरची प्रतीक्षा आहेच.    – लीलाधर पटले, सामाजिक कार्यकर्ता, इसासनी.